लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत असलेली पाटकर रस्त्यावरील उदवहनाची कळ (बटण) बिघडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकात झटपट जाण्यासाठी या उदवहनाचा बहुतांशी प्रवासी वापर करतात. मागील काही दिवसांपासून या उदवहनाची स्कायवॉक दिशेकडील कळ बिघडली आहे. एकदा उदवहन प्रवासी घेऊन रेल्वे जिन्याच्या दिशेने गेले की पुन्हा उदवहन तळाची कळ दाबल्यावर खाली येत नाही. या उदवहनची कळ दुरुस्ती केली जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातून रेल्वे स्थानकातील फलाटावर जाण्यासाठी पाटकर रस्त्यावर कैलास लस्सी दुकानालगत रेल्वेचे उदवहन आहे. नोकरदार प्रवाशांबरोबर दम्याचा त्रास, हदय रोग आणि इतर व्याधी असलेल्या अनेक प्रवाशांना जिन्याच्या पायऱ्यांवरून जाणे शक्य होत नाही. असे प्रवासी उदवहनच्या माध्यमातून रेल्वे जिन्यावर जाऊन तेथे रेल्वे स्थानकातील फलाटावर किंवा डोंबिवली पश्चिम दिशेकडे जातात.

मागील काही दिवसांपासून उदवहनच्या वरच्या बाजुकडील कळ (बटण) बिघडली आहे. प्रवासी एकदा तळाच्या भागाकडून उदवहनमधून रेल्वे जिन्याच्या दिशेने वर गेले की, पुन्हा तळाला असलेल्या प्रवाशांनी वर गेलेली उदवहन खाली येण्यासाठी तळाची कळ दाबली तरी उदवहन स्वयंचलित पध्दतीने खाली येत नाही. अनेक प्रवासी तळाची कळ दाबत बसतात. त्याचा काही उपयोग होत नाही. रेल्वे जिन्याकडील वरच्या भागातून प्रवासी तळाला येत असेल त्या प्रवाशांनी वरून कळ दाबली की मग उदवहन खाली येते. जोपर्यंत रेल्वे जिन्याकडून प्रवासी तळ भागात येत नाही, तोपर्यंत उदवहन वरच्या भागात अडकून पडते.

या उदवहनचा दररोज शेकडो प्रवासी वापर करतात. त्यामुळे पाटकर रस्त्यावरील उदवहनाची बिघडलेली कळ लवकर दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. हे उदवहन विविध कारणांमुळे आठवड्यातून एक ते दोन वेळा बंद असते. आता कळ बिघडल्यामुळे हे उदवहन बंद राहत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. रेल्वे स्थानकातील तांत्रिक कर्मचारी हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. उदवहनचे तांत्रिक जाळे वेगळ्या प्रकारचे असल्याने विद्युत तारतंत्रींना तो बिघाड सोडविता येत नाही. त्यासाठी उदवहनची देखभाल करणारे कर्मचारीच ते काम करू शकतात, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. उदवहनमधील कळ बिघडल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना दिली आहे, असे अधिकारी म्हणाला.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील उदवहनची कळ बिघडल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. यासंबंधी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या उदवहनमधील बिघाड दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. -लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.