डोंबिवली- डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी दिशेला फलाटावर सहा डब्यांच्या दरम्यान छताला एकही पंखा नसल्याने प्रवासी घामाघूम होत आहेत. यापूर्वीच्या थांब्याच्या तीन डबे पुढे जाऊन लोकल थांबते. त्या भागात छताची सोय नसल्याने प्रवाशांची दोन्ही बाजुने घुसमट होत आहे.
कडक उन्हाचे दिवस सुरू झाले आहेत. घरातून बाहेर पडल्या पडल्या घामाच्या धारा सुरू होतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर आले की सीएसएमटी दिशेच्या बाजुला पाच ते सहा डब्यांच्या दरम्यान छताला पंखे नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रुमालाने घाम पुसत उभे रहावे लागते. त्याच्या पुढील भागात गेले तर तेथे छत नसल्याने प्रवाशांना सावलीसाठी पंखा नसलेल्या भागात उभे रहावे लागते. लोकल आली की धावत जाऊन लोकल पकडावी लागते. रेल्वे स्थानिक अधिकारी सतत डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवर फिरत असतात. त्यांना फलाट पाचवर पंखे नसल्याची बाब निदर्शनास येत नसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>> ज्या ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली ते पोलीस आयुक्त आहेत तरी कोण ?
मध्य रेल्वे स्थानकावरील डोंबिवली रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. सर्वाधिक महसूल या स्थानकातून रेल्वे प्रशासनाला मिळतो. तरीही पंख्यासारख्या किरकोळ बाबींसाठी प्रवाशांना तक्रारी कराव्या का लागतात, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. छतावरील तापलेले पत्रे, उन्हाच्या झळा त्यात फलाट पाचवर पंखे नसल्याने प्रवाशांची लाहीलाही होते. रेल्वे प्रवासी संघटनांनी हा विषय मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे मांडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, पावसाळ्यापूर्वी छत नसलेल्या भागात छत टाकण्याची कामे पूर्ण करुन घ्यावीत. अन्यथा प्रवाशांची तारांबळ, पावसामुळे लादीवर पाय घसरुन प्रवाशांचे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर पंखे नसल्याचा विषय आपण मध्य रेल्वे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून तातडीने त्याठिकाणी पंखे बसविण्याची मागणी करणार आहेत. तसेच तीन डबे लोकल आता पुढे जाऊन थांबते. त्या वाढत्या भागात छताची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, ही मागणीही केली जाणार आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता आरगडे, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी सांगितले.