लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली, कोपर, विठ्ठलवाडी, आंबिवली रेल्व स्थानकांमधील पंखे सकाळच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याने उन्हाच्या काहिलीने हैराण प्रवाशांना फलाटावर घामांच्या थारांमध्ये निथळत उभे राहावे लागते. कडक उन्हाळ्याचे दिवस विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने पहाटेपासून फलाटावरील पंखे सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून वातावरण चोवीस तास गरम आहे. मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पडणारा गारवा आता गायब झाला आहे. सततच्या तलखीने नागरिक हैराण आहेत. अनेक नागरिक पहाटेच्या वेळेत ठाकुर्ली स्थानकात येऊन प्रवास सुरू करतात. घर ते स्थानक प्रवास करतानाच नागरिक घामाघूम होतात. रेल्वे स्थानकात गेल्यावर पंख्याखाली उभे राहू, या विचारात असलेल्या प्रवाशांना फलाटावरील पंखे बंद असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे.

आणखी वाचा-संकेतस्थळावरील चुकीच्या अनुक्रमांकामुळे कल्याण रेल्वे स्थानकात इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना प्रवाशांची तारांबळ

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पंखे सकाळच्या वेळेत बंद असल्याची तक्रार प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे. ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, कोपर स्थानकामध्ये हा अनुभव येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले, एक वाजल्यानंतर शेवटची कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गेल्या की फलाटावर सामसूम असते. त्यामुळे रात्री एक ते पहाटेपर्यंत फलाटावर प्रवासी नसल्याने अनावश्यक वीज वापर टाळण्यासाठी पंखे ठेवण्यात येतात. पहाटेच्या लोकल सुरू झाल्या की फलाटावरील पंखे सुरू केले जातात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers sweat as the fans on the platforms are switched off in the morning hours mrj