लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात कर्जत, कसारा, कल्याण, टिटवाळा, बदलापूरकडून येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खच्चून भरुन येतात. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना फलाटावरुन लोकल डब्यात चढणे शक्य होत नाही. धक्काबुक्की करत डब्यात चढण्यापेक्षा बहुतांशी प्रवासी रेल्वे मार्गात उभे राहून उलट दरवाजातून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी या रेल्वे मार्गावरुन लोकल, एक्सप्रेस आली तर अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे.
सकाळी साडे सात ते साडे आठ वाजेपर्यंत दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून हा नियमितचा प्रकार सुरू आहे. यापूर्वी काही ठराविक प्रवासी उलट दिशेने डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते. आता बहुतांशी प्रवासी फलाटावरुन डब्यात चढणे शक्य होत नसल्याने रेल्वे मार्गात उभे राहून उलट दिशेच्या दरवाजातून लोकलमध्ये चढतात. आपत्तकालीन पायऱ्यांचा वापर ते डब्यात चढण्यासाठी करतात.
हेही वाचा… ठाणे लोकसभेच्या जागेचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
कर्जत, कसारा, टिटवाळा, अंंबरनाथ, बदलापूरकडून येणाऱ्या बुहतांशी जलद लोकल दिवा रेल्वे स्थानकात थांबतात. या लोकल कल्याण, डोंबिवलीपासून प्रवाशांनी खचाखच भरुन येतात. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांना फलटावरुन सहजपणे चढताना धक्काबुक्की करावी लागते. अशीच परिस्थिती सकाळच्या धिम्या गतीच्या लोकलची आहे.
हेही वाचा… कल्याणमध्ये अखंड वाचनयज्ञ; दहा हजारहून अधिक वाचक आणि रसिकांचा सहभाग
सकाळच्या वेळेत दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. या गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात नसतात. त्याचा गैरफायदा काही प्रवासी घेत आहेत. रेल्वे मार्गात उभे असताना अचानक बाजुच्या रेल्वे मार्गावरुन लोकल, एक्सप्रेस आली तर अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे.
हेही वाचा… मोदकोत्सव स्पर्धेत वैविध्यपुर्ण मोदकांची मेजवानी
दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना उलट दिशेच्या दरवाजातून डब्यात चढून दिले नाही तर ते दादागिरी करुन डब्यात चढून विरोध करणाऱ्या प्रवाशाला संघटितपणे गप्प बसवितात. त्यामुळे याविषयावर डब्यातील कोणीही प्रवासी या प्रकाराला विरोध करण्यास तयार होत नाही. उलट दिशेच्या दरवाजात दाटीवाटीने उभ्या असलेल्या प्रवाशांना दिव्यातील प्रवाशांचा त्रास होतो. त्यांना काही बोलण्याची सोय नसते, असे प्रवाशांनी सांगितले.
उलट दिशेने चढताना एखाद्या प्रवाशाचा पाय लोकलची आपत्कालीन पायरी किंवा इंजिनच्या तारांच्या वेटोळ्यात अडकला तर अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. यापूर्वी रेल्वे मार्गात उभे राहून ठराविक प्रवासी लोकलच्या उलट दिशेच्या दरवाजातून लोकलमध्ये चढत होते. आता बहुतांशी प्रवासी याच मार्गाने लोकलमध्ये चढत असल्याच्या तक्रारी आहेत. रेल्वे प्रशासनाने या प्रकराची दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.