ठाणे : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेगाड्या उशीरा धावत असल्याने सीएसएमटी-मंगळूरू रेल्वेगाडीतील काही प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला होता. त्यानंतर रविवारी दुपारी ही रेल्वेगाडी निळजे स्थानकात थांबल्यानंतर काही प्रवाशांनी स्थानकात उतरून तोडफोड केली. रेलरोको आणि तोडफोड या दोन्ही घटनेप्रकरणी दिवा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात (आरपीएफ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शहापूर : रानातील पायवाटेवर महिलेची प्रसूती

पनवेल येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे शनिवारी दुपारी पनवेल-कळंबोली स्थानकादरम्यान घसरले होते. त्याचा परिणाम कोकणातून वाहतुक करणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. दिवा रेल्वे स्थानकात सीएसएमटी मंगळूरू एक्स्प्रेस थांबल्याने संतापलेल्या काही प्रवाशांनी सुमारे एक तास रेल रोको केला होता. त्याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर झाला. त्यानंतर रविवारी दुपारी ही एक्स्प्रेस निळजे स्थानकात थांबली. त्यामुळे काही प्रवासी निळजे स्थानकात उतरले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरील काचा फोडल्या. तसेच झाडांच्या कुंड्या फेकून देत तोडफोड केली. याप्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा >>> ठाण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम शिवसेनेकडून हायजॅक

रेलरोको आणि तोडफोड या दोन्ही घटनेप्रकरणी रविवारी रात्री दिवा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात रात्री उशीरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे कारवाई केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers vandalized at nilaje railway station zws
Show comments