डोंबिवली: पारपत्र काढण्याच्या कोणत्याही कामासाठी यापुढे कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा परिसरांतील रहिवाशांना ठाणे येथे जाण्याची गरज लागणार नाही. या सर्व सुविधा डोंबिवली एमआयडीसीतील सावित्रीबाई नाट्य मंदिराजवळील टपाल पारपत्र सेवा कार्यालयात देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य टपाल मास्टर जनरल हरीश चंद्र अग्रवाल यांनी दिली.

पारपत्र कार्यालयात पारपत्र काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकाच्या कागदपत्रांची छाननी, बायोमेट्रिक चाचणी ही सर्व कामे डोंबिवली कार्यालयातून पार पडतील. यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पारपत्र कार्यालयात टपाल कार्यालय, पारपत्र विभागाचे कर्मचारी एकत्रितपणे सेवा देतील. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर ती कागदपत्रे पोलिसांकडे त्या नागरिकाच्या पडताळणीसाठी पाठविण्यात येतील. पोलिसांनी तात्काळ पडताळणीची कामे पार पाडली तर विहित वेळेत नागरिकांना घरपोच जलदगती टपालाने पारपत्र देण्यात येणार आहे.

अनेक वेळा पारपत्र कार्यालयाकडून पोलिसांकडे कागदपत्रे पडताळणी गेली की तेथे वेळखाऊपणा केला जातो. त्यामुळे पारपत्रास विलंब होतो. काही रहिवासी भाड्याच्या घरात राहतात. त्यांना पारपत्र मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी पोलिसांनी घरमालकाचे ना हरकत पत्र ग्राह्य धरून, तो गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा नाही हे पाहून त्या रहिवाशाची पडताळणी कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी सूचना खा. शिंदे यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांना केली. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.  ठाणे, नाशिकनंतर मधल्या पट्ट्यात कोठेही पारपत्र सेवा केंद्र नसल्याने कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, भिवंडी, वाडा, कसारा, कर्जत, बदलापूर परिसरांतील रहिवाशांना या पारपत्र सेवा केंद्राचा लाभ घेता येणार आहे. पारपत्र सेवा केंद्राच्या उद्घाटनाला क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ. राजेश गावंडे, विशेष कार्य अधिकारी अशोक कुमार उपस्थित होते.

सहा लाख पारपत्रांचे घरपोच वाटप

देशातील टपाल कार्यालयांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत सहा लाख पारपत्रांचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. पारपत्रांची ही वाढती गरज ओळखून देशाच्या विविध भागांत अधिकाधिक टपाल पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्यात येतील. टपाल कार्यालयांचे वाढते जाळे आणि मनुष्यबळाचा विचार करून अधिकाधिक जनहिताची कामे टपाल कार्यालयांमधून केली जातील, असे प्रतिपादन केंद्रीय संचार राज्यमंत्री देर्वुंसह चौहान यांनी मंगळावारी केले. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील टपाल कार्यालयात पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री चौहान यांनी आभासी पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.

Story img Loader