जिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञांची वानवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्य़ातील गोरगरीब रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा एकीकडे केला जात असतानाच जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात मात्र हृदयरोगतज्ज्ञांची वानवा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात दाखल  रुग्णाला हृदयरोगाचे निदान होताच पुढील उपचारासाठी त्याची रवानगी मुंबईतील जेजे तसेच केईएम रुग्णालयात केली जात आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने या रुग्णालयात हृदयरुग्णांवर प्राथमिक उपचार करून इतरत्र दाखल होण्याचा सल्ला दिला जात आहे.

मध्यवर्ती शासकीय रुग्णालय तेथील भोंगळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मध्यंतरी या रुग्णालयास भेट देऊन तेथील व्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही वेळोवेळी  रुग्णालयास भेट देऊन  व्यवस्थेची पाहाणी केली होती. मात्र, सरकार बदलूनही जिल्हा शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेत फारसा बदल झाल्याचे अपवादानेच दिसत आहे. स्वस्त आणि शासकीय दरांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याने जिल्ह्य़ातील विविध भागांमधून येथे दाखल  रुग्णांचा आकडा मोठा आहे. मात्र, असुविधांमुळे  बरेचसे रुग्ण ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाची दारे ठोठावतात अशी परिस्थिती आहे.

 रुग्णांचे हाल

रुग्णालयात दिवसाला १५-२० रुग्ण दाखल होत असतात.  रुग्णांवर  प्राथमिक उपचार केले जातात.  तज्ज्ञ डॉक्टरांची पदे या ठिकाणी रिक्त असल्याने रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जाण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.  आधुनिक यंत्रणाही उपलब्ध नाही.  रुग्णालयात ई.सी.जी. यंत्रे, व्हेंटिलेटरची सुविधा येथे उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक कांबळे यांनी दिली.

सरकारी दावाखान्यात तज्ज्ञ तसेच अधिक शिकलेले डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे या रुग्णालयात हृदय रोगासंबंधी आवश्यक आधुनिक यंत्रणा उभारली तरी ती उपयोगात कोण आणणार असा सवाल आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात हृदयरोगाचा त्रास जाणवणारे रुग्ण आल्यास त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. त्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाली की संबंधित रुग्णास जे.जे. किंवा के.ई.एम. येथे दाखल केले जाते.

-अशोक कांबळे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन