डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. किरकोळ उपचारांसाठी रुग्णांना ठाणे, मुंबई येथील रुग्णांलयांत पाठविले जाते. काही औषधे बाहेरून विकत घेण्यास भाग पाडली जातात. विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या बाहेरून करण्यास सांगितल्या जातात. श्वान, सर्प दंशाच्या इंजेक्शनसह इतर औषधांचा रुग्णालयात नेहमीच तुटवडा असतो. शास्त्रीनगर रुग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा येत्या पंधरा दिवसात उपलब्ध करून द्या, नाहीतर रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालय प्रशासनाला दिला.
मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, माजी नगरसेविका कोमल पाटील, सुदेश चुडनाईक यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला, शास्त्रीनगर मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी यांना दिले. गर्भवती महिलांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आली की तिची प्रकृती गंभीर आहे सांगून तिला मुंबई, ठाण्यात उपचारासाठी पाठविले जाते. श्वान, सर्प दंशाचे रुग्ण आले की त्यांना आयत्यावेळी इंजेक्शन उपलब्ध नाहीत असे सांंगितले जाते. काही दिवसापूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली. तिला मुंबईतील रुग्णालयात नेले पाहिजे, असे शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती वैद्यकीय विभागाच्या प्रमुखांना दिल्यावर शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेला प्रसूतीसाठी कल्याणमधील वसंत व्हॅली रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे महिलेची प्रसूती सुस्थितीत असल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले. दिवा साबे परिसरातील साप चावलेली महिला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आली होती. तिला मुंबईत उपचारासाठी पाठविण्याचे डाॅक्टरांंनी सूचित केले. त्या महिलेचा वाटेत मृत्यू झाला, अशी माहिती राहुल कामत यांनी दिली.
उपस्थिती अगोदर स्वाक्षऱ्या
शास्त्रीनगर रुग्णालयातील हजेरी नोंदणी पुस्तकात एका डाॅक्टरने २० एप्रिलपर्यंतच अगोदरच हजेरीच्या स्वाक्षऱ्या करून ठेवल्या होत्या, असे मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. शास्त्रीनगर रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध करून देण्यासाठी मागील चार वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, असे पालिका डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी मनसेचे संदीप (रमा) म्हात्रे, स्मिता भणगे, अरूण जांभळे, प्रेम पाटील, सुमेधा थत्ते, प्रेम पाटील, श्रीकांंत वारंगे, राजू पाटील, नंदकुमार भोसले, चेतन म्हात्रे, रितेश म्हात्रे, अश्विन पाटील उपस्थित होते.
पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय सामान्य रुग्णांचा मोठा आधार आहे. या रुग्णालयात गर्भवती महिला, अपघात, गंभीर रुग्णांवर उपचार होत नसतील तर रुग्णालयाचा पांढरा हत्ती पोसण्याची गरजच नाही. येत्या १५ दिवसात रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अन्यथा मनसे रुग्णालयाला टाळे ठोकेल.- राहुल कामत, शहराध्यक्ष, मनसे.
शास्त्रीनगर रुग्णालयात सर्व प्रकारचा पुरेसा औषध, इंजेक्शन साठा आहे. रुग्णांवर तत्पर उपचार केले जातात.- डाॅ. दीपा शुक्ला,वैद्यकीय आरोग्य अधिकारी.