डोंबिवली- डोंबिवली आणि ठाणे रेल्वे स्थानकातील काही फलाटांवरील पेव्हर ब्लाॅक, लाद्या निघाल्या आहेत. या भागातून जाताना अनेक प्रवाशांना दररोज घसरगुंडीचा सामना करावा लागतो. ठाणे, डोंबिवली सारख्या वर्दळीच्या फलाटांवरील लाद्या निघाल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेण्यात येत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
सकाळ, संध्याकाळच्या वेळेत डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानके गर्दीने ओसंडून वाहत असतात. डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज अडीच लाखाहून अधिक प्रवासी, ठाणे रेल्वे स्थानकातून साडे तीन लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे स्थानकांमधील प्रवासी सुविधांची काळजी घेणे हे रेल्वे प्रशासनाचे काम आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा >>>समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर दिवा बाजुकडे खानपान टपरी जवळ मागील अनेक महिन्यांपासून फलाटाच्या कोपऱ्यावर बसविलेले पेव्हर ब्लाॅक उखडले आहेत. पेव्हर ब्लाॅकवरुन जाताना अनेक प्रवासी दररोज पाय घसरुन किंवा मुरगळून पडतात. फलाटावरील गर्दीत जायला नको म्हणून अनेक प्रवासी पेव्हर ब्लाॅकवरुन फलाटाच्या दिवा बाजूकडे जातात. महिला वर्गाचा डबा फलाटाच्या दिवा बाजुकडे येतो. त्यामुळे महिला वर्गाची पेव्हर ब्लाॅक भागातून सकाळ, संध्याकाळ सर्वाधिक वर्दळ असते.
हेही वाचा >>>‘समृद्धी’वर १६ मजुरांवर काळाचा घाला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून दखल; ट्वीट करत म्हणाले…
सकाळी, संध्याकाळी घाईघाईने या पेव्हर ब्लाॅक भागातून जाताना गर्दीमुळे अनेक प्रवाशांना तुटलेले पेव्हर ब्लाॅक लक्षात येत नाहीत. मुसळधार पाऊस असला की खचलेल्या पेव्हर ब्लाॅक भागात पाणी साचते. प्रवासी आचके खात या खड्ड्यांमधून येजा करतात. रेल्वे प्रशासनाने तातडीेने हे तुटलेले पेव्हर ब्लाॅक सुस्थितीत करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
हेही वाचा >>>Samruddhi Highway: शहापूर इथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असतांना क्रेन कोसळून १७ कामगार ठार
ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १० वर जिना उतरण्याच्या समोरच लादीचा तुकडा निघाला आहे. घाईघाईने लोकल पकडताना प्रवासी या लादी निघालेल्या खळग्यात पाय अडखून पडतात. दररोज अनेक प्रवाशांना या तुटलेल्या लादीचा फटका बसतो, असे या लादीच्या बाजुला खानपान सेवा असलेल्या टपरी चालकाने सांगितले. नवी मुंबई, पनवेल भागात जाणारे प्रवासी या रेल्वे जिन्यावरुन येजा करतात. त्यांना या तुटलेल्या लादीचा सर्वाधिक फटका बसतो.