लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: ठाकुर्ली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेली अनधिकृत वाहनांच्या घुसखोरीला लगाम घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने या भागातील रस्त्यांवर पैसे भरा आणि वाहने उभी करा योजना सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानका जवळ रेल्वेला समांतर गणेशनगरकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अनेक वर्षापासून प्रवाशांकडून रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात होती. रेल्वे प्रवासी नसलेले वाहन चालक शहरात दिवसा वाहन उभी करण्यास जागा नाही म्हणून ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर, मोकळ्या जागेत वाहने उभी करुन ठेवत होते. या वाहनांमुळे या भागातून येजा करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
आणखी वाचा- मुंबई, ठाण्यातील सराईत चोरटे; डोंबिवलीत मोबाईल चोरीत अटक
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वे स्थानक भागात दुचाकी वाहनाने येतात. त्यांना रेल्वे स्थानक भागात वाहने उभी करण्यास जागा नसल्याने त्यांची कुचंबणा होत होती. रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवेशव्दारावर, बाजुला प्रवासी वाहने उभी करुन निघून जात होते. या वाहनांमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात येजा करणे अवघड होत होते. या अनधिकृत वाहनतळाविषयी अनेक तक्रारी काही जागरुक प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे केल्या होत्या.
रेल्वेच्या वरिष्ठांनी या जागेची पाहणी करुन ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील अनधिकृत वाहनतळ हटविण्यासाठी रेल्व स्थानकापासून सुमारे १५० मीटर अंतरापर्यंत वाहने उभी करणाऱ्यांना दर आकारण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी एक ठेकेदार प्रशासनाने नेमला आहे. रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली पश्चिम रेल्वे समांतर रस्ता ते गणेशनगर रेल्वे मैदान भागात वाहनतळाची सुविधा दर आकारुन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
आणखी वाचा-नस्ती गायब प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
वाढते गैरप्रकार
ठाकुर्ली पश्चिम निर्जन भाग असल्याने अनेक प्रेमीयुगल या भागात दिवसा, रात्री येत होती. अनेक गैरप्रकार या भागात होत होते. वाहनतळ सुरू झाल्याने या भागातील गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून रेल्वेला महसूल मिळणार आहे. पाच वर्षासाठी हा ठेका देण्यात आल्याची माहिती आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. सायकलसाठी मासिक ३०० रुपये, दुचाकींसाठी ४५०, मोटारसाठी ७५० रुपये दर आहे. तसेच वाहन उभे करण्यासाठी सायकल, मोटार, चारचाकीसाठी तासिका तत्वावर दर आकारला जाणार आहे.
पालिकेचे दुर्लक्ष
९० फुटी रस्ता, ठाकुर्ली उड्डाण पुलाखालील गाळ्यांखाली पालिकेने वाहनतळ सुरू करण्याची नागरिकाची मागणी आहे. महसूल वाढविण्यासाठी प्रयत्नशील प्रशासनाचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष नाही, या नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
“ प्रवाशांना रेल्वे स्थानका जवळ वाहनतळाची सुविधा असावी. रेल्वे स्थानकात येताना प्रवाशांना कोणताही अडथळा असू नये. अनावश्यक वाहनांची या भागातील वर्दळ थांबविण्यासाठी वाहनतळ सुरू करण्यात आले आहे.” -तेरेन्स पिंटो, स्थानक अधिकारी, ठाकुर्ली रेल्वे स्थानक.