ठाणे : महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी म्हणजेच ६ नोव्हेंबरपुर्वी वेतन देण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. यामुळे प्रत्येक महिन्याला वेतनाची वाट पाहणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीपुर्वी वेतन मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा, पाणी पुरवठा तसेच इतर विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांची संख्या तीन ते साडेतीन हजार इतकी आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात उद्या काही भागात पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा केले जाते. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हजेरी नोंद पाहून त्यांना वेतन अदा केले जाते. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला वेतन अदा करणे बंधनकारक आहे. परंतु त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही आणि या वेतनाची तारीखही निश्चित नसते. काही दिवसांपुर्वी वेतन मिळाले नाही म्हणून पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याची मागणी ठाणे म्युन्सिपल युनियनने पालिका प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी एक परिपत्रक काढले असून त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी म्हणजेच ६ नोव्हेंबरपुर्वी वेतन देण्यात यावे, असे आदेश सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. तसेच कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना ६ नोव्हेंबरपुर्वी वेतन होईल याची दक्षता द्यावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader