लोकसहभाग, श्रमदानातून जुचंद्रच्या गावकऱ्यांकडून तलावाची साफसफाई

एखाद्या कामासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता लोकसहभाग आणि श्रमदान या मार्गाचा अवलंब केल्यास कठीणातील कठीण काम पूर्ण होते आणि त्याचा फायदाही मोठा होतो, हेच नायगाव येथील जुचंद्र ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. या गावातील पाझर तलावात गाळ साचला होता, त्याची कित्येक वष्रे साफसफाई झाली नव्हती. जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाझर तलाव आणि गावातील राजावळी तलावाचे उत्खनन लोकसहभागातून आणि श्रमदानातून केले. त्यामुळे पाझर तलावाची क्षमता ५० दशलक्ष लिटर, तर राजावळी तलावाची क्षमता १८ दशलक्ष लिटरने वाढली आहे. एकजुटीचे दर्शन घडवून ग्रामस्थांनी या कामासाठी लागणारे कोटय़वधी रुपयेही वाचवले आहेत.

जुचंद्रमधील पाझर तलावाची क्षमता ३०० दशलक्ष लिटर आहे; परंतु दिवसेंदिवस गाव आणि परिसरातील लोकसंख्या वाढू लागल्याने पाझर तलावाचे पाणी अपुरे पडू लागले होते. त्यातच गेल्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने तलाव पूर्ण न भरल्याने पाण्याचे संकट उभे राहिले होते. हा तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतो. त्यामुळे तलावातील गाळ काढून त्याचे उत्खनन केल्यास अधिक पाणीसाठा होईल, असे ग्रामस्थ सांगत होते; परंतु जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे हे काम होत नव्हते. अखेर ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्वत: तलावाचे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक कन्हैय्या भोईर यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून तलावाचे उत्खनन करण्याची परवानगी मागितली. ती परवानगी मिळताच १३ मे रोजी कामाला सुरुवात झाली. गावातील दानशूर व्यक्तींनी यंत्रणा पुरवली. सलग ४२ दिवस तलावातील गाळ काढण्यात येऊ लागला. या दिवसांत या तलावातून २२ हजार ३६० ब्रास माती काढण्यात आली. त्यामुळे तलावाच्या एकूण क्षमतेत ५०.६२ दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे, तर राजावळी तलावाच्या साठवण क्षमतेतही १८.११ दशलक्ष लिटरची वाढ झाली आहे, असे कन्हैय्या भोईर यांनी सांगितले. पालघर जिल्हा प्रशासन, लघुपाटबंधारे विभागातील अभियंत्यामार्फत मुख्य बंधाऱ्याची आणि इतर आवश्यक बाबींची तांत्रिक पडताळणी करण्यात आली आहे. हे काम जर जिल्हा परिषदेने ठेकेदारामार्फत केले असते तर कोटय़वधी रुपयांचा खर्च आला असता, असेही भोईर यांनी सांगितले.

Story img Loader