अंबरनाथः राज्यात झालेल्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथीनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुधवारी वाढदिवस साजरा केला गेला. अंबरनाथ, बदलापूर शहरात ऐरवी मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या जाणाऱ्या या दिवशी शुकशुकाट पहायला मिळाला. दोन्ही शहरातील बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे यंदा जाहीर फलकबाजीही दिसली नाही. समाज माध्यमांवर मात्र सर्वच माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही समाजमाध्यमातून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शिवसेना नेते, पदाधिकारी, आमदार आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून जवळपास सर्वच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसात दोन्ही शहरांतील हे नगरसेवक एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या राजकीय उलथापालथीनंतर बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. मात्र एरवी अंबरनाथ आणि बदलापूर शहरात जंगी साजरा होणाऱ्या या वाढदिवशी शुकशुकाट पहायला मिळाला. अंबरनाथ शहरातील विविध चौक ऐरवी या दिवशी शुभेच्छांच्या फलकांनी भरलेले असतात. मात्र बुधवारी या चौकांमध्ये एकही फलक लावण्यात आल्याचे दिसले नाही. अंबरनाथ पूर्वेला एका आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक परिसरात छोटेखानी फलक लावले मात्र त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला होता. बदलापूर शहरातही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहरात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्य़ात आल्या होत्या. शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिंदे गटाला समर्थन करणाऱ्या काही इच्छुकांनी छोटेखानी फलक लावले. त्यावरही मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे छायाचित्र छापण्यात आले होते.

दोन्ही शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीरपणे फलकबाजी केली नसली तरी जवळपास सर्वांनीच समाज माध्यमांतून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. यात शिवसेने एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कार्यालयातर्फे समाज माध्यमांवर शुभेच्छा संदेश प्रसारीत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अनेक माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांनीही शुभेच्छा दिल्या. सर्वोच न्यायालयाचा प्रलंबित असलेला निकाल आणि पक्षावरचे वर्चस्व याबाबत स्पष्टता येत नसल्याने अनेकांनी दोन्ही गटांशी संवाद ठेवण्याची भूमिका स्विकारल्याचे दिसते आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peace uddhav thackeray birthday split shiv sena wishes social media ysh