कल्याण – मागील काही दिवसांपासून सकाळच्या वेळेत कल्याण पश्चिमेतील गांधारी उड्डाण पूल वडवली-आंबिवली भागातील वनराई परिसरात सकाळच्या वेळेत फिरण्यास गेलेल्या नागरिकांना मोरांचे दर्शन होत आहे. सहा मोरांचा थवा या भागातील वनराईत सकाळपासून झुडपांमधून, मोकळ्या माळरानावर फिरत असतो. सकाळी सहा वाजल्यापासून फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या मोरांचे दर्शन होत आहे.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात मोरांचे दर्शन होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. कल्याण शहरातील अनेक नागरिक पहाटेपासून गांधारे उड्डाण पूल भागातील टिटवाळा ते कल्याण बाह्यवळण रस्ता भागात येतात. गांधारी उड्डाण पूल भागात आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. तेथून गांधारे, आंबिवली, वडवली,अटाळी दिशेने पायी टिटवाळा दिशेने जातात. यामध्ये शहरातील डाॅक्टर, वकील, कार्पाेरट, प्राध्यापक, तरूण, तरूणी यांचा सहभाग असतो. अनेक कुटुंब सकाळच्या वेळेत येथे फिरण्यासाठी येतात.

गांधारे पुलाकडून आंबिवली-वडवली दिशेने बाह्य वळण रस्त्याने पायी जात असताना रस्त्याच्या दुतर्फा ताड, माड, आंबे, मोह, जंगली झाडे, झुडपांचे जंगल आहे. या गर्द झाडीत विविध प्रकारचे पक्षी अधिवास करून आहेत. सकाळच्या वेळेत या पक्ष्यांचा चिवचिवाट, कलकलाट या भागात असतो. या कलकलाट झुडपांमधून, मोकळ्या माळरानावर सहा मोरांचा थवा विहार करत असतो.

नागरिकांना पाहिल्यानंतर मोर जागीच थुईथुई नाचून पसारा फुलवत सलामी देतात. मोर आणि त्यांचा फुलणारा पिसारा यांची मोबाईलमधून छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची चढाओढ असते. आपणास पाहून मोरांनी पळून जाऊ नये म्हणून शांतपणे नागरिक मोरांना आपल्यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही याची काळजी घेतात.

कल्याण शहरा जवळील जंगलात मोरांचा अधिवास आहे आणि त्यांचे दररोज आपणास दर्शन होत असल्याने सकाळच्या वेळेत या भागात फिरण्यासाठी येणारे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

या रस्त्यावर या भागात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेवर मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, फटाक्यांचा कचरा पडलेला असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या भागात काही जण येऊन मेजवान्या करत असल्याचा संशय नागरिकांना आहे. या भागातील प्राणी, पक्षी यांचा अधिवास पाहून या भागात रात्रीच्या वेळेत कोणीही धिंगाणा घालणार नाही याची काळजी पोलीस आणि वन विभागाने घेण्याची मागणी निसर्गप्रेमी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भागात रात्री उशिरा पोलिसांची गस्ती वाहन फिरत असतात, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.कल्याणमधील गांधारे पुलाकडून वळण रस्त्याने वडवली आंबिवली दिशेला आपण दररोज सकाळी फिरण्यासाठी जातो. या कालावधीत आपणास दिवसाआड या भागात सकाळच्या वेळेत मोरांचा थवा दिसतो. या कालावधीत मोर थुईथुई करून पिसारा फुलवतो हे विहंगम दृश्य पाहताना प्रसन्न वाटते.

कल्याण शहराजवळील जंगलात मोरांसह विविध प्रकारची जैवविविधता आहे त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. अजय क्षीरसागर रहिवासी, कल्याण.