कल्याण-डोंबिवली शहराची निवड स्मार्ट सिटीसाठी झाल्यावर यासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने डोंबिवली शहरातील फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी कचऱ्यापासून बायो मिथेन प्रकल्प आणि सेंद्रीय भाजीपाला व धान्य विक्री केंद्र सुरू करण्याचा संकल्प केला आहे. अशा स्वरूपाचा संकल्प राबविणारी ही पहिलीच संघटना असून त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी जमा केल्याचे संघटनेचे प्रशांत सरखोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकल्पाविषयी सांगताना सरखोत म्हणाले, फेरीवाले व भाजीवाले हे तळागाळातील लोक असून त्यांच्याकडूनही शहरात मोठय़ा प्रमाणावर कचरा होतो. या कचऱ्याची जर आम्हीच विल्हेवाट लावली तर त्यापासून इंधन, खतनिर्मिती होईल तसेच शहरातील नागरिकांना सेंद्रीय धान्य व भाजीपाला मिळेल. त्यांचेही विक्री केंद्र आम्ही सुरूकरणार आहोत. या सर्व प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची आवश्यकता, त्याचबरोबर भूखंडाचीही गरज भासेल. दररोज एक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल या क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्याचा आमचा मानस आहे. सध्या आमच्या संघटनेमध्ये दीड हजार सभासद असून आम्ही सर्वानी ५० लाख रुपयांचा निधीही जमा केला आहे.
प्रकल्प सल्लागार प्रणव सरखोत म्हणाले, बायो गॅस प्रकल्पामध्ये टाकाऊ सेंद्रीय कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने क्षेपणभूमीचा प्रश्न सुटू शकेल. यापासून निर्माण होणारा बायो गॅस घरगुती इंधन म्हणून वापरता येईल. टाकाऊ कचऱ्याचे दर्जेदार सेंद्रीय खत निर्माण होते. हे खत आपण शेतकऱ्यांना विकू शकतो.
संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे म्हणाले, डोंबिवली पश्चिमेतील काही विक्रेते हे भाजीपाल्यापासून तयार होणारा कचरा उचलतात. प्लॅस्टिक पिशव्यांची बंदी करून कागदी किंवा कापडी पिशव्या वापरा याविषयीही आम्ही फेरीवाले व ग्राहकांमध्ये जनजागृती करणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा