लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे- स्थानकातील मुंबई दिशेकडील सॅटीसला जोडणारा पुल फलाट क्रमांक सात ते दहा करिता बंद करण्यात आला आहे. फलाट सात ते दहा येथील पुल दुरुस्तीच्या कामाकरिता दोन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे.प्रवाशांना फलाट सात ते दहावर जाण्याकरिता मुंबई दिशेकडील पुल वगळता मधला पुल तसेच इतर पुलांवरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रासास सामोरे जावे लागत आहे.
आणखी वाचा-ठाणे : नवजात बालकांच्या सुदृढ वाढीसाठी महापालिकेचा मुंबई आयआयटीसोबत उपक्रम
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानक हे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई बरोबरच लाखो नोकरदार वर्ग ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईकरिता प्रवास करतात. नवी मुंबई शहरातील ऐरोली, रबाळे आणि घनसोली भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, मुख्यालये आहेत. येथे अनेकजण काम करतात. मात्र या फलाटांना जोडणाऱ्या पुलांपैकी मुंबई दिशेकडील पुल दुरुस्तीकरिता बंद करण्यात आला आहे. फलाट क्रमांक सात – आठवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा आहे. येथील प्रवासी जड सामानासह प्रवास करत असतात. हा पादचारी पुल फलाट क्रमांक दोन ते सहाकरिता चालू असून फलाट सात पासून त्याचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्याकरिता हा पुल बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सुर उमटतांना दिसत आहे.