Acid Attack कल्याण पूर्वेतील सूचक नाका भागातून पायी चाललेल्या एका पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर एका सफेद रंगाच्या मोटारमधील प्रवाशांनी ॲसिड फेकल्याने पादचारी गंभीररित्या भाजला आहे. ॲसिड फेकल्यानंतर मोटार कार चालक भरधाव वेगाने निघून गेला. रविवारी दुपारी ही घटना कल्याण पूर्व भागातील सूचकनाका येथे घडली.
हेही वाचा >>>ठाण्यात चार ते पाच दिवस पाणी टंचाई, जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे चार दिवस ५० टक्केच पाणी पुरवठा
रुक्मिणीबाई रुग्णालयात या रुग्णावर उपचार न झाल्याने त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढे न जाण्याचा न निर्णय घेतल्याने जखमी रुग्णाला कल्याण मधील घरी आणण्यात आले. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांवर उपचार होत नसतील तर मग फक्त ताप, थंडीसाठीच ही रुग्णालये आहेत का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.सुशील मुननकर (३८, रा. कोयल टिलाई चाळ, उत्कर्ष नगर, भांडूप पश्चिम) असे ॲसिड फेकल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. सुशील यांची भाची रसिका बांदिवडेकर (रा. नेतिवली, कल्याण पूर्व) यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हेही वाचा >>>कल्याण : टिटवाळा-खडवलीदरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
पोलिसांनी सांगितले, रसिका बांदिवडेकर या आपल्या आई, आजी सोबत कल्याण पूर्वमध्ये राहतात. रसिका घाटकोपर येथे नोकरी करतात. रसिकाचा मामा सुशील मुननकर हे मीरा भाईंदर येथे नोकरी करतात. गेल्या सोमवारी सुशील हे रसिका यांच्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुशील हे कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून आपल्या भाचीच्या घरी पायी चालले होते. नेतिवली नाका ओमा रुग्णालय जवळून जात असताना समोरुन एक सफेद रंगाची मोटार कार आली. कार मधील अनोळखी इसमाने धावत्या कार मधून सुशील यांच्या चेहऱ्यावर जोरदार स्प्रे फवारणी केली. ती चुकविण्यासाठी सुशील खाली वाकले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर फवाऱ्यातील ॲसिड उडाले. घरी येईपर्यंत सुशील यांच्या चेहरा आणि डोळ्याची जळजळ सुरू झाली होती.
सुशीलला नातेवाईकांनी तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण मधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन डाॅक्टरांनी त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथील डाॅक्टरांनी सुशील यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यास सांगितले. रुग्णालयांमधून मिळणाऱ्या सल्ला आणि वागणुकीमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सुशील यांना आपल्या राहत्या घरी आणले.कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.