डोंबिवली पूर्वेतील डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी एक अवजड डम्परने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. डोंबिवली शहरात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्ते कामांसाठी माल घेऊन येणारे डम्पर चालक शहरातून भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याच्या तक्रारी आहेत.
अशाच एका अवजड डम्परचे चाक एका पादचाऱ्याचा चेहऱ्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या पादचाऱ्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी एक पादचारी डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जात असताना रघुकुल सोसायटी जवळ एका अवजड मालवाहू डम्परने पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या धडकेत पादचारी डम्परच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पादचाऱ्यांनी ओरडा केल्यानंतर डम्पर चालकाने वेग कमी केला. एका बांधकाम कंपनीच्या मालकीचा हा डम्पर आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>>कल्याण मधील वाडेघर येथे गृहप्रकल्पाच्या दारात स्मशानभूमी; रहिवाशांचा विरोध
गटारांसाठी खोदाई
डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर, संगितावाडी, राजेंद्रप्रसाद रस्ता भागात मागील तीन महिन्यांपासून गटार, पदपथांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे पदपथ, गटारे जागोजागी खोदून ठेवली आहेत. आता वर्दळीच्या शिवमंदिर चौकातील गटारे, पदपथ खोदून ठेवण्यात आले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ते नाहीत. खोदलेल्या गटार, पदपथांच्या पुढे फेरीवाले ठाण मांडून बसतात. त्यात रस्त्याच्या दुतर्फा दुकानांसमोर उभी केलेली वाहने. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास रस्ते, पदपथ राहत नाहीत. या कोंडीतून हा अपघात झाला आहे, असे दत्तनगर भागातील रहिवाशांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर, संगितावाडी भागातील गटारे, पायवाटा करण्यासाठी पालिकेला पैसा कोठून उपलब्ध झाला आहे, असे प्रश्न अनेक माजी नगरसेवक, जागरुक नागरिक करत आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाची कामे या भागात सुरू असताना पालिका अधिकाऱ्यांचे या कामांवर लक्ष नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रिट वापरुन गटार बांधणीची कामे केली जात आहेत. एकाही बांधकामात वाळूचा वापर केला जात नसल्याचे या भागातील जागरुक रहिवाशांनी सांगितले. या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.