कल्याण रेल्वे स्थानका जवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका रिक्षा चालकाने दोन साथीदारांच्या साहाय्याने एका प्रवाशाला लुटल्याची घटना सोमवारी पहाटे ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा भागात घडली आहे. रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी प्रवाशाला लुटल्याने खळबळ उडाली आहे.

अभिषेक हुबलाल विश्वकर्मा (२२, रा. पिसवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. अभिषेक एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सोमवारी पहाटे पाच वाजता अभिषेक कल्याण रेल्वे स्थानक येथे आला. तेथून त्याने पिसवली येथे जाण्यासाठी एक रिक्षा केली. रिक्षेमध्ये रिक्षा चालकासह आणखी दोन प्रवासी होते. चालकाच्या सांगण्यावरुन अभिषेक रिक्षेत बसला. खंबाळपाडा येथे जाणारा एक प्रवासी घेऊन आम्ही तुला पिसवली येथे सोडतो असे रिक्षा चालकाने अभिषेकला सांगितले.

हेही वाचा >>> झटपट श्रीमंत होण्यासाठी अंधश्रध्देतून कासवाची पूजा ; कल्याण पूर्व मधील प्रकार

रिक्षा पत्रीपूल कडून ९० फुटी रस्त्याने खंबाळपाडा भागात मंजुनाथ महाविद्यालय जवळ आली. पहाटेच्या वेळेत त्या भागात कोणीच नव्हते. रिक्षेतील एक प्रवासी उतरून रिक्षा चालक आपणास पिसवली येथे घेऊन जाणार असा विचार अभिषेक करत होता. खंबाळपाडा येथे रिक्षा चालकासह त्याच्या दोन साथीदारांनी अभिषेकाला दमदाटी करुन तुझ्या जवळ काय आहे असे म्हणून त्याच्या खिशातील आणि पिशवीतील मोबाईल, डेबिट कार्ड आणि रोख रक्कम काढून घेतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने अभिषेक घाबरला. अभिषेकने त्यास प्रतिकार केला पण तिघांनी त्यास दाद दिली नाही. आपल्या जवळ पैसे नाहीत. एवढ्या दूरवरुन आपण पिसवली येथे जाऊ शकत नाही. आपणास पिसवली येथे सोडा अशी मागणी अभिषेकने रिक्षा चालकाकडे केली. त्याने काही न ऐकता लुटलेला ऐवज घेऊन घटनास्थवरुन पळ काढला.

अभिषेकने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. रिक्षा चालक प्रवाशांना लुटू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. उपनिरीक्षक ए. एस. धोंडे तपास करत आहेत.

Story img Loader