डोंबिवली पूर्वेला पालिका आयुक्तांच्या आगमनाने लपंडाव रंगला
सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजून गेलेला असतो. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी स्वतंत्र पथके असूनही ती कुचकामी असल्याने पादचाऱ्यांना फेरीवाल्यांचा त्रास सहन करीत घर, स्थानक गाठावे लागते. मंगळवारी सकाळी आयुक्त ई. रवींद्रन डोंबिवलीत येणार असल्याची कुणकुण लागताच या संपूर्ण परिसराला काही तासांपुरती का होईना फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळाल्याचे चित्र होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी डोंबिवलीत आले त्या दिवशी सकाळपासून कल्याण, डोंबिवलीतील रस्ते स्वच्छ आणि फेरीवाला मुक्त ठेवण्याची ‘काळजी’ कर्मचाऱ्यांनी घेतली होती.
त्यानंतर मंगळवारी आयुक्तांच्या दौऱ्यानिमित्त हा संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे चित्र दिसून आले. आयुक्तांना दौऱ्यात डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्ते कसे स्वच्छ, सुंदर आणि फेरीवाला मुक्त आहेत, हे दिसावे म्हणून फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी ही क्लृप्ती लढविल्याचे सांगितले जाते. डोंबिवली पूर्वेतील फडके रस्ता, नेहरु रस्ता, बाजीप्रभू चौक भागातील फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते फेरीवाला मुक्त असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, सततच्या वर्दळीचे पाटकर रस्ता, उर्सेकर वाडी, कैलास लस्सी दुकान ते रामनगर रेल्वे तिकिट खिडकी रस्ता, राजाजी पथ, कामत मेडिकल पदपथांवरील फेरीवाल्यांवर ग प्रभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
या प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी मधुकर शिंदे यांचे फेरीवाला हटाव पथकावर कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्रभागातील फेरीवाले रस्त्यावरुन हटत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिंदे यांना ग प्रभागातून हटविण्याचे आदेश आयुक्त रवींद्रन यांनी वेळोवेळी दिले आहेत. प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे समजते.
सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात फेरीवाल्यांविरुद्ध पथकाकडून कारवाई सुरू असल्याचे आणि कामगार योग्यरितीने काम करीत असल्याचे अहवाल वेळोवेळी आयुक्तांना द्यायचे आहेत. मात्र, असे अहवाल आयुक्तांपर्यत वेळेवर पोहचविले जात नसल्याचे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा