डोंबिवली : निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे जाणारी वाहतूक पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. अतिशय महत्वपूर्ण काम या रस्त्यावर सुरू असल्याने या कालावधीत दुचाकी, मोटार कार चालकाने उलट मार्गिकेतून येऊन वाहतूक कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई बरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे महत्वपूर्ण काम सुरू असल्याने या कामात रस्ते वाहतुकीमुळे कोणताही अडथळा येता कामा नये, यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी, मुंब्रा वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. पाच दिवस शिळफाटा रस्ता बंदच्या कालावधीत या रस्त्यावर हलक्या वाहनांचीही वाहन कोंडी होऊ नये यादृष्टीने वाहतूक विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक टाळण्यासाठी प्रवाशांना पर्यायी चार मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत, काही वाहने पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात आली आहेत, असे वरिष्ठ निरीक्षक सांडभोर यांनी सांगितले.
अशाही परिस्थितीत काही मोटार, दुचाकी चालक मधल्या मार्गाने गतीने जाऊ असा विचार करून शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेत घेऊन इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वाहनांमुळे सुरळीत असलेल्या शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिळफाटा आणि पर्यायी रस्ते मार्गावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या दुचाकी, मोटार कार चालकांवर मोटार वाहन कायद्याने दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे. हे वाहन चालक शिळफाटा रस्त्याजवळच्या छेद रस्त्यावरून मुख्य शिळफाटा रस्त्यावर येतात. छेद रस्ता भागात वाहतूक पोलीस नसला की उलट मार्गिकेतून प्रवास सुरू करतात. असे प्रकार करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द गुन्हे दाखल केले जात आहेत. एखादा वाहन चालक पुन्हा पुन्हा उलट मार्गिकेतून प्रवास करत आहे असे निदर्शनास आले तर निर्ढावलेला वाहन चालक म्हणून त्या वाहन चालकाचा वाहतूक परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवून त्याच्या परवान्यावर काही महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक विभागातर्फे केली जाणार आहे. ही कटु कारवाई टाळण्यासाठी, शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहन चालकांनी योग्य मार्गिकेतून, पर्यायी रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जावे, असे सांडभोर आवाहन सांडभोर यांनी केले आहे.
शिळफाटा आणि पर्यायी रस्ते मार्गावर उलट मार्गिकेतून वाहन चालविणाऱ्या मोटार, दुचाकी आणि इतर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई बरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. वाहन चालकांनी उलट मार्गिकेतून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये. सचिन सांडभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक. कोळसेवाडी वाहतूक विभाग.