स्वच्छ सर्वेक्षण उद्दिष्टपूर्तीसाठी वसई-विरार महापालिकेचा निर्णय
कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मीरा भाईंदर महानगरपालिकेने घेतला आहे. वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाने याआधीही अनेक वेळा जाहीर केले आहे. परंतू आजपर्यंत एकदाही ही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात होत असलेले स्वच्छ सर्वेक्षण लक्षात घेऊन महापालिकेने हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन वर्षांपासून कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. परंतू या आवाहनाला प्रशासनाकडून कृतीची जोड मिळत नसल्याने वर्गीकरणाला प्रतिसादच मिळत नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिका नागरिकांना आवाहन करत असली तरी ओला आणि सुका कचरा स्वतंत्र गोळा करण्यासाठी महापािलकेकडे आतापर्यंत पुरेशा गाडय़ाच उपलब्ध नव्हत्या. महापालिकेच्या आवाहनाला प्रामाणिकपणे प्रतिसाद देऊन अनेक रहिवासी सोसायटय़ांनी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली परंतू प्रशासन कचरा गोळा करताना तो एकत्रच नेत आहे. स्वच्छ सर्वेक्षण आली की प्रशासन खडबडुन जागे होते आणि कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर देते.
आता पुन्हा एकदा कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत हा दंड असणार आहे. मात्र यावेळी देखील ही कारवाई गांभीर्याने केली जाणार का याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या रहिवासी सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याचा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या घोषणा महापालिकेने याआधीही अनेकवेळा केल्या आहेत. परंतू आजपर्यंत त्याची महापालिकेने अंमलबजावणीच केलेली नाही. त्यामुळे यावेळीही हा इशारा गांभीर्याने घ्यावा की नाही अशीच नागरिकांची अवस्था आहे.
केंद्र सरकारकडून दरवर्षी शहराचे स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण केले जाते. त्यात शहरांना गुण मिळण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरत असतो. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारचे पथक सर्वेक्षणासाठी शहरात दाखल होणार आहे. त्यावेळी कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे की नाही याची पथकाकडून पहाणी केली जाणार आहे आणि त्यावरच महापालिकेला गुण मिळणार आहेत. त्यामुळे हे स्वच्छ सर्वेक्षण डोळ्यासमोर ठेवूनच प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे.
सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र गाडय़ा
कचऱ्याचे वर्गीकरण केवळ स्वच्छ सर्वेक्षणासाठी नाही तर यापुढे नियमितपणे ते करण्यावर महापालिकेचा भर असणार आहे. सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी आता पुरेशा गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. १५ आरोग्य निरीक्षकांना प्रत्येकी एक याप्रमाणे गाडी देण्यात आली असून दररोज या गाडय़ांचे दोन फेरे करण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे यांनी दिली.