दिवसा तापलेल्या कचऱ्याला सायंकाळी आग लावण्याचे प्रकार

दिवसभराच्या उन्हाने तप्त झालेला आधारवाडी क्षेपणभूमीवरील कचरा संध्याकाळी सात वाजल्यानंतर आगी लावून पेटविण्यात येत आहे. हा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर आजुबाजुच्या वस्तीत, कल्याण शहराच्या काही भागात घुसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील रहिवाशांना जगणे मुश्किल झाले आहे.

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. हवा कुंद असते. त्यामुळे वस्तीमध्ये घुसलेला धूर वारा नसल्याने इमारतीच्या कानाकोपऱ्यात थर करून राहतो. शहराबाहेर प्रदुषित धुराचे पट्टे तयार होतात. दारे, खिडक्या बंद केली तरी, दरवाजा, खिडक्यांच्या सांधे, कोपऱ्यातून धूर घरात येत राहतो. घरात पंखा चालू केला तर, धुराचा आणखी त्रास होतो. असे या भागातील रहिवासी व ज्येष्ठ वकील शांताराम दातार यांनी सांगितले.

कल्याण न्यायालयाने आधारवाडी क्षेपणभूमी बंद करा म्हणून यापूर्वीच आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने पालिकेची ही क्षेपणभूमी बंद करीत नाहीत म्हणून खरडपट्टी काढली आहे. तरीही प्रशासन आधारवाडी क्षेपणभूमी बंद करण्यासाठी पावले का उचलत नाही, असा प्रश्न दातार यांनी केला आहे. पालिकेला नक्की ही क्षेपणभूमी बंद करण्याची इच्छा आहे की, नाही. हे प्रशासनाने एकदा जाहीर करावे, असेही पुढे ते म्हणाले.

महापौर, आयुक्तांनी एकदा अनुभवावे..

अलिकडे दररोज संध्याकाळ झाली की, धुराच्या भीतीने अस्वस्थ व्हायला होते. हा धूर काय प्रकारचा आहे हे अनुभवण्यासाठी एकदा महापौर, आयुक्त व इतर पालिका पदाधिकाऱ्यांनी काही तास संध्याकाळच्या वेळेत क्षेपणभूमी परिसरातील वस्तीत यावे, म्हणजे वस्ती भोवतीचे रहिवासी कसे जीवन जगत आहेत याचा अनुभव पदाधिकारी, अधिकाऱ्यांना येईल, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

Story img Loader