कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील नागरिक, वाहन चालकांचे पाठीचे कणे दुखावले आहेत. अनेकांना कंबर, मान, खांदे दुखीचा त्रास सुरू झाला आहे. एवढे होऊनही कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, शहर अभियंता विभागाने खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही तत्परता या कालावधीत न दाखविल्याने कल्याण डोंबिवलीतील नागरिक, नेटकऱ्यांनी समाज माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे.
गेल्या आठवड्यात दहीहंडी उत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खड्ड्यांचा आणि वाहन कोंडीचा त्रास नको म्हणून भिवंडी बाजूने बोटीने डोंबिवली रेतीबंदर खाडी किनारी आले. त्यामुळे नागरिक आणखी संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिळफाटा किंवा भिवंडी-दुर्गाडी दिशेने वाहनाने येऊन या रस्त्यांची काय दुरवस्था झाली आहे. प्रवासी दररोज या खड्डेमय रस्त्यांवरुन कसे प्रवास करतात. त्यांना कोणता त्रास होतोय हे कळले असते, अशी टीका नेटकऱ्यांनी सुरू केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील एका महिलेने मुख्यमंत्री साहेबांना आमच्या नांदिवली, देसलेपाडा येथील रस्त्यावरुन आणावे म्हणजे त्यांना रस्त्यांची अवस्था काय झाली आहे. आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते हे लक्षात आले असते अशी टीका केली आहे. शहर अभियंता विभागाने पावसाळा पूर्वीचे खड्डे भरणीची कामे मे-जून अखेरपर्यंत पूर्ण केली असती तर खड्ड्यांचा प्रश्न मुसळधार पावसात निर्माण झाला नसता. पावसाळा पूर्वीची खड्डे भरणीची कामे जुलै मध्ये सुरू करण्यात आली. शहर अभियंता विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसला, अशी माहिती आता उघड झाली आहे. शहर अभियंता यांच्या संथगती कामामुळे प्रभागातील अभियंत्यांना खड्ड्यांमुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा… जुन्या ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्याची चिन्हे
साहसी खेळ
कल्याण, डोंबिवलीतून वाहन चालविणे याला साहसी खेळाचा दर्जा द्यावा. नोकरीत पाच टक्के आरक्षण आणि १० लाखाचा विमा उतरविण्यात यावा. गोविंदा वर्षातून एकदा येतो. या शहरातील नागरिक, प्रवासी ३६५ दिवस खड्ड्यांच्या स्पर्धेत उतरलेले असतात, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
हेही वाचा… ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड
देव प्रसन्न पण..
डोंबिवलीतील एक रहिवासी खूप गरीब आणि भाड्याच्या खोलीत राहत होता. गरीबीतून बाहेर काढण्यासाठी तो देवाकडे धावा करायचा. एक दिवस देव त्याला प्रसन्न होऊन म्हणाले, वत्सा बोल तुला काय पाहिजे. गरीबाने त्याच्याकडे मोठे घर मागितले. नोकरीची मागणी केली. देवाने गरीबाच्या पाप पुण्याच्या तक्ता सीबील उघडून तपासला. त्यात गरीबाने काही चांगली कामे तर काही वाईट कृत्यही केली होती. दे्वाने गरीबाला शिळफाटा रिजन्सी वसाहती जवळील एका नामचिन वसाहतीमध्ये घर घेऊन दिले. पाप केले म्हणून ठाण्यात वागळे इस्टेट येथे एका कंपनीत नोकरी मिळवून दिली. आणि या गरीबाने दररोज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वेळेत नियमित शिळफाटा रस्त्याने प्रवास करण्याची अट घातली. देव त्यानंतर अंतर्धान पावले. शिळफाट्यावरील कोंडीच्या त्रासाने वैतागलेला तो गृहस्थ आता आपणास गरीबच ठेवावे यासाठी देवाचा धावा करत आहे.
हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिका शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित
आईला उचकी
एका मंत्र्याच्या आईला सारखी उचकी लागत होती. मंत्र्याने आईला रुग्णालयात नेले. डाॅक्टरने सांगितले कारण फार मोठे नाही. हा त्रास फक्त १२ दिवसाचा आहे. कोकणात गणपतीसाठी जाणारे लोक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तुमच्या मातोश्रींची सारखी आठवण काढतात. त्या आठवणीने ही उचकी लागत आहे. अनंत चतुर्थी संपली की त्रास कमी होईल.
प्रेमवीराचे काव्य
एक आडवा नि तिडवा खड्डा, चंद्रावानी पडलाय ग, तो कंत्राटदार हसतो कसा, कल्याण डोंबिवलीकर पालथा पडला ग, या आकांताचा इशारा तुला कळला ग, खड्डा आडवा आला, माझा पाय मोडला ग, नको राणी नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू, इथून जाऊ तिथून जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू.