डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहराच्या विविध भागात मागील तीन ते चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने घरून काम करणारे नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, आजारी वृध्द, लहान बालके यांना त्रास होत आहे.

कल्याण पूर्व, टाटा नाका परिसर, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तापमानाचा पारा ४० पार करुन पुढे जात असताना नागरिक आता सावली, थंडावा शोधत आहेत. अशा परिस्थितीत घरात वीज नसेल तर रहिवाशांची हैराणी होत आहे. बहुतांशी नोकरदार वर्ग आजही घरातून कार्यालयीन कामकाज करतो. त्यांची वीज प्रवाह खंडित झाल्यावर सर्वाधिक कोंडी होते.

हेही वाचा… डोंबिवलीतील निळजे पाड्यातील उच्चशिक्षित घरफोड्याला अटक, ४७ तोळे सोने जप्त

एमआयडीसीत एमएमआरडीएच्या निधीतून काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना जेसीबी चालक अतिशय निष्काळजीपणाने जेसीबी चालवून भुयारी वीज वाहिन्या, जलवाहिन्या फोडतो. गेल्या शुक्रवारी अशाच प्रकारे महावितरणची एक वीज पुरवठा वाहिनी खराब झाली. त्याचा फटका डोंबिवलीतील अनेक भागांना बसला. ही वाहिनी दुरुस्तीसाठी महावितरणचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होते.

हेही वाचा… डोंबिवलीतील खासगी सावकाराचे काटई गावातील हॉटेलमधून अपहरण

२७ गावांमधील पिसवली परिसरात विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. पिसवली भागातील डोंगरावर बेकायदा झोपड्या उभ्या राहत आहेत. या झोपड्यांना अस्तित्वातील रोहित्रावरुन वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे विजेचा भार वाढवून वीज पुरवठा खंडित होतो. नियमित वीज देयक भरणा करणाऱ्या रहिवाशांना त्याचा फटका बसत आहे. पिसवली भागातील विजेच्या लपंडावामुळे या भागातील रहिवाशांनी माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या टाटा नाका भागातील कार्यालयावर मोर्चा नेला होता. पिसवली परिसरातील एकाही बेकायदा झोपडी, चाळी, इमारतींना वीज पुरवठा देऊ नये अशी मागणी रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडे केली.

हेही वाचा… Maharashtra News Live : “नागपुरातील मविआच्या सभेची भाजपाला भीती वाटते आहे”, नाना पटोलेंची टीका; जाणून घ्या प्रत्येक अपडेट…

सोमवारी मध्यरात्रीपासून कल्याण पूर्व भागातील अनेक विभागात विजेचा लपंडाव सुरू होता. नेतिवली सर्कल भागात महावितरणची वीज वाहिनी गेलेल्या भागातून पालिकेची जलवाहिनी गेली आहे. जलवाहिनी फुटून पाणी वीज वाहिनीत जात असल्याने वीज प्रवाह खंडित होत असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिली. नेतिवली सर्कल मधील वीज वाहिनीमधील तांत्रिक बिघाड कायमचा दूर करण्यासाठी महावितरणचे अभियंते, कर्मचारी या भागात दोन दिवस सक्रिय होते. मंगळवार पासून कल्याण पूर्व भागाचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. विजेचा लपंडाव थांबला असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

कल्याण, डोंबिवलीत वीज जाण्याचे कोणतेही कारण नाही. स्थानिक पातळीवर काही तांत्रिक बिघाड झाला तर काही वेळ वीज पुरवठा खंडित होत असेल. पण कायमस्वरुपी वीज पुरवठा होत नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित झाला तर तो तात्काळ सुरू करण्याच्या सूचना उपविभागीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत, असे वरिष्ठाने सांगितले.

Story img Loader