ठाणे : भिवंडी येथील पांजरा पोळ भागात निशाण हॉटेलच्या पाठीमागे खाली करण्यात आलेला तळ अधिक एक मजल्याच्या कारखान्याचे बांधकाम मंगळवारी सकाळी कोसळले. यात चारजण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील पांजरा पोळ भागात निशाण हॉटेलच्या पाठीमागे तळ अधिक एक मजला असा कारखाना आहे. ही अत्यंत जुनी इमारत असल्याने ती रिकामी करण्यात आली होती. ही इमारत सकाळी सात वाजता कोसळली. यामुळे त्याच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये एक व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्याचबरोबर या घटनेत आणखी तीन व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. या तिघांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला असल्याने त्याला सिराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.