डोंबिवली शहरावर घाणेरडय़ा शहराचा बसलेला कलंक कायमचा पुसून काढण्यासाठी शहरातील विविध स्तरांतील मंडळी एकत्र आली आहेत. या मंडळींनी डोंबिवली शहर स्वच्छतेचा एक आराखडा तयार करून तो पालिका प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्याचा एक ‘व्हिजन डोंबिवली’ हा भविष्यवेध प्रकल्प तयार केला आहे. त्यानिमित्त या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्याशी ‘लोकसत्ता ठाणे’ने साधलेला संवाद..
डॉ. उल्हास कोल्हटकर – समन्वयक, कचरा निमूलन ‘व्हिजन डोंबिवली’ प्रकल्प

* शहर स्वच्छतेसाठी ‘व्हिजन डोंबिवली’ हा भविष्यवेध प्रकल्प स्थापन करण्यामागील उद्देश काय?
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात डोंबिवली, कल्याण शहरे कचरा निर्मूलनाबाबत अतिशय मागे आहेत. त्यामुळे घाणेरडय़ा शहरांच्या यादीत या दोन्ही शहरांचा समावेश झाला. शहराचे विश्वस्त नागरिक म्हणून शहरातील कुणालाही ही बाब भूषणावह नव्हती. डोंबिवली एक सुशिक्षित, सांस्कृतिक आणि चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. देशात सुरू झालेल्या काही चांगल्या उपक्रमांची सुरुवात डोंबिवलीपासून झाली आहे. डोंबिवली शहरावर बसलेला घाणेरडय़ा शहराचा शिक्का कायमचा पुसून टाकण्यासाठी, शहरातील कचरा निर्मूलन, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता स्थानिक पालिका प्रशासनाबरोबर शहरातील प्रत्येक रहिवासी, सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे. माझं गाव, माझं शहर या आत्मीयतेने प्रत्येक रहिवाशाने कचरा निर्मूलनामध्ये पुढाकार घेतला तर, शहर स्वच्छता हा विषय आव्हानात्मक असला तरी, तसा अवघड नाही. डोंबिवली स्वच्छ, स्वस्थ आणि सुरक्षित असले पाहिजे. कचरा विषयक सामाजिक भान निर्माण करणे, हा विचार करून ‘व्हिजन डोंबिवली’ हा प्रकल्प शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
* या प्रकल्पात कोणाचा सहभाग आहे?
शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरणविषयक संस्था, कचरा निर्मूलनासाठी व्यक्तिगत पातळीवर काम करणारे कार्यकर्ते, वास्तुविशारद, विकासक, डॉक्टर, वकील, संरचनात्मक अभियंते, सनदी लेखापाल, ज्येष्ठ नागरिक संघटना, फेरीवाले, रिक्षा संघटना, कचरा वेचक, महिला बचत गट, शिक्षण संस्था, प्रवासी संघटना, औषध विक्रेता, उद्योजक संघटना, रोटरी क्लब, ऊर्जा फाऊंडेशन, मॉल, किराणा दुकानदार, लायन्स क्लब, नेपाळी गुरखे अशा प्रत्येक स्तरातील वर्गाला या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात आले आहे. डोंबिवलीत ३५० विविध प्रकारच्या संस्था आहेत. त्या प्रत्येक संस्थेने या उपक्रमात सहभागी व्हावे, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन या प्रकल्पाचा आधारबिंदू ठेवण्यात आला आहे. शहर स्वच्छतेसाठी म्हणून लागणारे हरएक प्रकारचे साहाय्य पालिका प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
* लोकांचा सहभाग या प्रकल्पात कसा करून घेणार?
कचरा निर्मूलनासाठी स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यमय आणि हरित डोंबिवली हे मुख्य लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या चार मुख्य उद्दिष्टांना समोर ठेवून शहर स्वच्छता, कचरा निर्मूलनासाठी सहभागी लोकांचे सतरा गट विविध आघाडय़ांवर काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. असाच एक गट शहर स्वच्छता किती महत्त्वाची आहे. प्रत्येक रहिवाशाने या प्रकल्पात कसा आणि किती सहभाग दाखवला पाहिजे, या विषयीची जनजागृती करण्यासाठी घरोघर फिरणार आहे. या जागृतीमधून अधिकाधिक रहिवाशांना या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग. एन. सी. सी., एन. एस. एस.च्या विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी असतील. एखाद्या भागात रस्ते, परिसर, प्रभागाची स्वच्छता करताना स्थानिक रहिवासी सहभागी होतील, त्यांनी कायमस्वरूपी या भविष्यवेध प्रकल्पात आपल्या आवडीच्या क्षेत्रात सहभागी व्हावे आणि स्वच्छ स्वस्थ, सुरक्षित डोंबिवलीला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येणार आहे.
* स्वच्छतेसाठी मुख्य भर कशावर असणार आहे?
कल्याण-डोंबिवलीत दररोज ६५० मेट्रिक टन कचरा तयार होतो. पालिकेच्या आठ प्रभागांमध्ये सरासरी ७० ते ८० मेट्रिक टन कचरा तयार होतो. या कचऱ्यातील ओला, सुका कचरा, प्लॅस्टिक, थर्माकोल, जैविक कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने स्थानिक पातळीवर, पालिकेच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होईल, या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालिकेची यंत्रणा त्यांच्या चौकटीत ओला, सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करणे, त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे या प्रकारचे प्रकल्प आकाराला आणत आहे. हे प्रकल्प आकाराला येईपर्यंत ‘व्हिजन’चे कार्यकर्ते गटागटाने कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट किती आणि का महत्त्वाची आहे. ओला, सुका कचरा वेगळ्या पद्धतीने दिल्यावर होणारे फायदे समजावून सांगत आहेत. त्याचप्रमाणे कचरा घर, सोसायटीच्या परिसरातील खड्डय़ात त्याची विल्हेवाट लावून खत, बायोगॅस, ऊर्जा निर्मिती कसे करता याचे महत्त्व रहिवाशांना पटवून देणार आहेत. कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट आणि त्या विषयक जनजागृतीला सर्वाधिक महत्त्व देण्यात येणार आहे.
* या प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेचे कसे सहकार्य घेण्यात येणार आहे?
स्वच्छतेविषयीचा सतरा तारांकित विषयांचा गोषवारा आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासमोर ठेवण्यात आला. त्यांना व्हिजन डोंबिवलीचे स्वच्छताविषयक तयार करण्यात आलेले चित्रमुद्रित सादरीकरण दाखविण्यात आले. हे पाहिल्यानंतर आयुक्तांनी स्वच्छताविषयक तयार केलेल्या १७ तारांकित विषयांमधील पाच प्रमुख विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्याची सूचना केली. यामध्ये कचरा, ओला, सुका कचरा वेगळा देणे, ई वेस्ट, प्लॅस्टिक, थर्मोकोलचे निर्मूलन यांचा समावेश होता. या कचऱ्याच्या संकलन, निर्मूलनविषयी कार्यकर्त्यांनी जनजागृती केली तर, पालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या शास्त्रोक्त कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी त्याचा अधिक उपयोग होणार आहे. या समन्वयातून साखळी पद्धतीने कचऱ्याचे निर्मूलन करणे अधिक सोपे जाईल, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. टप्प्याने हे प्रकल्प जसे प्रत्यक्ष कृतीत आणि यशस्वी होतील त्याप्रमाणे कचरा निर्मूलनाचे पुढचे पाऊल उचलण्यात येणार आहे.
* स्वच्छता विषयक कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत?
रिक्षा वाहनतळाभोवती एक पांढरा पट्टा आखण्यात येईल. त्या रांगेत रिक्षाचालकाने व्यवसाय करावा. तेथे कागद, प्लॅस्टिक असा कोणताही कचरा दिसणार नाही याची काळजी त्याने घ्यावी. प्रवासी मिळेपर्यंत अनेक रिक्षाचालक बसल्याजागी रस्त्यावर थुंकतात. त्यांनी असा प्रकार करू नये, याविषयी जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, आदर्श सोसायटी स्पर्धा घेण्यात येईल. यामध्ये सोसायटीने कचरा निर्मूलनासाठी राबविलेले उपक्रम, पाणी वापरासाठी आणि संवर्धनाची सुविधा, भोवतालची वनराई, इमारतीवरील टाकीमधील स्वच्छता अशी पाहणी करून संबंधित सोसायटीला आदर्श सोसायटी पुरस्कार देण्यात येईल. अशा सोसायटय़ांचा पालिकेने सन्मान करावा, त्यांना मालमत्ता करात काही सूट देता येईल का, असाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पाळीव कुत्री रस्त्यावर विष्ठा टाकतात. त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवून तेथेच त्यांची विष्ठा नष्ट होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. फेरीवाले, भाजीबाजारात कचरा तयार होतो. तो रस्त्यावर न येता, स्थानिक विक्रेत्यांनी त्यांनी दिलेल्या जागेत टाकावा, यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. इ-कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागली जाईल. आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर कसा राहील यासाठी सोसायटय़ांना एकत्रित करून त्यांच्याकडून आपल्या भागात स्वच्छता करण्याविषयी ‘व्हिजन’चे कार्यकर्ते प्रत्यक्ष कृतीसह मार्गदर्शन करतील. आदर्श प्रभागासाठी डोंबिवली पूर्व पश्चिमेतील एकूण सहा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. कागदी, तागाच्या पिशव्यांना प्राधान्य देण्याची दुकानदारांना गळ घालण्यात येणार आहे. कागदाचे गणपती, शाडूचे गणपतींना प्राधान्य. या सगळ्या उपक्रमांमध्ये राजकीय मंडळींना पक्षीय वस्त्र बाहेर ठेवून मगच सहभागी करून घेण्यात येणार आहे. विनाराजकीय असा हा स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
* पाणी बचतीविषयी काही उपक्रम आहेत?
प्रत्येक सोसायटीने जलसंचय योजना राबविली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नवीन इमारतींना परवानगी देताना पालिकेने जलसंचय योजना (रेन वॉटर हार्वेस्टिंग) विकासकांना सक्तीची करावी, अशी सूचना करण्यात येणार आहे. ज्या सोसायटय़ांमध्ये कुपनलिका आहेत. त्यांच्या अवतीभोवती शोष खड्डे तयार करून, त्या कूपनलिकेत पावसाचे पाणी मुरवण्याचे उपक्रम, कूपनलिका नसेल तर सोसायटीच्या आवारात तीन बाय तीनचा खड्डा खणून त्यात सोसायटीच्या गच्चीवरून वाहून येणारे पावसाचे पाणी मुरविण्यासाठी उपाययोजना करणे. आवारातील जुन्या विहिरी स्वच्छ करून घेणे, प्रसंगी त्या पाण्याचा वापर सार्वजनिक कामासाठी करून देणे. सोसायटींवरील प्रत्येक टाकी किमान सहा महिन्यांनी स्वच्छ करण्यात आली पाहिजे, अशी जागृतता या मोहिमेत करण्यात येणार आहे.
* अन्य शहरांनी या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शनाची मागणी केली तर आपण तो उपलब्ध करून देणार का?
होय, स्वच्छतेबाबतचा हा प्रकल्प परिपूर्ण आहे. फक्त प्रत्येक शहरातील व्यक्ती, संस्थेने त्यात कोण व्यक्ती कुठे बसेल एवढा साचा भरला की, हा प्रकल्प अमलात आणणे अवघड नाही. हा प्रकल्प ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना, संस्था मागणी करतील त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. या प्रकल्पाचे पेटंट वगैरे नाही. पण, हा प्रकल्प राबविताना ‘व्हिजन डोंबिवली’चा प्राधान्याने उल्लेख व्हावा अशी मागणी करण्यात येणार आहे. संबंधितांना हा प्रकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येईल.
* सामान्यांना काय आवाहन कराल?
शहराचे आरोग्य सृदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक रहिवाशाने शहराचा एक विश्वस्त, स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी व्हावे. आणि शहराच्या आरोग्याबरोबर शहरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य ठणठणीत राहील यासाठी प्रयत्न करावेत. मी, माझे घर, माझा प्रभाग या चौकटीपुरेत मर्यादित न राहता, सामान्यांनी माझ शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसे राहील, या दृष्टिकोनातून व्हिजन प्रकल्पात कार्यरत राहावे.
मुलाखत : भगवान मंडलिक

Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Unauthorized construction CIDCO proposal for Navi Mumbai
अनधिकृत बांधकामांना दंडाची पळवाट!  नवी मुंबईसाठी ‘सिडको’चा प्रस्ताव; सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधदंड आकारणी कशी असेल?
Amitesh Kumar, Pub Culture Pune, Pune Police Commissioner , Coffee with CP , Pune, loksatta news,
पुणे : विरोध ‘पब’ला नाही; गैरप्रकारांना, पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन, पबसाठी नियमावली आवश्यकच
Pimpri illegal Bangladesh citizens, Police action Bangladesh citizens, Pimpri, illegal Bangladesh citizens,
पिंपरी : अवैध बांगलादेशींविरुद्ध पोलिसांचा बडगा; ‘वाचा’ आतापर्यंत किती जणांवर केली कारवाई?
Jewelery worth more than Rs 6 crore stolen from bullion shop in Thane railway station area
नागपुरात अधिवेशनासाठी हजारो पोलीस रस्त्यावर, तरीही चक्क कानशिलावर पिस्तूल ठेवून…
High Court takes notice of Thane to Borivali double tunnel project Mumbai
ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी बोगद्यांच्या प्रकल्पाचा आरएमसी प्लांट स्थलांतरित करा; रहिवाशांच्या मागणीची उच्च न्यायालयातर्फे दखल
waste collection charges mumbai
मुंबई : कचऱ्यावर शुल्क आकारणीचा निर्णय अनिर्णित, महापालिका निवडणुकीमुळे कर आकारण्याची शक्यता कमी
Story img Loader