श्रीनिवास घाडगे,ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सरकारी खात्यातील लाचखोरांविरोधात धडाकेबाज मोहीम सुरू असून यामध्ये पोलीस दलासह अन्य विभागांतील बडे अधिकारी लाच घेताना सापडले आहेत. असे असतानाही लाचखोरी थांबताना दिसत नाही. अनेकदा नेमकी तक्रार कुठे करावी आणि तक्रार दिलीच तर कारवाई होईल का, अशा अनेक प्रश्नांच्या विचारांनी नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत आणि येथूनच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळायला सुरुवात होते. या पाश्र्वभूमीवर लाचखोरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोणत्या उपाययोजना करीत आहे, याविषयी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्याशी केलेली बातचीत.
*लाचखोरी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपला विभाग कशा प्रकारे काम करतो?
शासनामार्फत मानधन मिळणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच शासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी आदींना लोकसेवक म्हणतात. एखाद्या कामाचा मोबदला म्हणून पैसे मागितले जातात किंवा पैसे दिले नाहीत म्हणून काम अडविले जाते. तसेच दलाल अथवा खासगी व्यक्तीमार्फत पैशांची मागणी केली जाते. अशा लोकसेवकांविरोधात तक्रार प्राप्त झाली तर संबंधित लोकसेवकांविरोधात सापळा रचून कारवाई करण्यात येते. लाचखोरांविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाते आणि तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाते.
* तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यामागचा हेतू काय?
लाचखोरांविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. तक्रारादाराला कोणताही त्रास होऊ नये आणि या प्रकरणात त्याच्यावर कोणताही दबाब येऊ नये, यासाठी तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते. एखाद्या अधिकाऱ्याकडे तक्रारदार तक्रार घेऊन आला तर संबंधित अधिकारी कारवाई होईपर्यंत गोपनीयता पाळतो. यामुळे या तक्रारीविषयी इतर कुणाला माहिती नसते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. कारण, त्याच्या नावावरून त्यांची ओळख पटू शकते. लाचखोर तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाईसाठी सापळा रचण्यात येतो. पण, एखादा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम करीत असल्याचे माहीत असेल तर त्या अधिकाऱ्याला पाहून लाचखोर सावध होऊ शकतो आणि लाचेचा सापळा अपयशी ठरू शकतो.
* आजघडीला लाचखोरीत कोणता विभाग आघाडीवर आहे?
गेल्या वर्षभराच्या कारवाईमध्ये महसूल आणि पोलीस विभाग लाचखोरीत आघाडीवर असल्याचे समोर आले असून त्यापाठोपाठ नगरविकास, महापालिका असे इतर विभागही लाचखोरीत पुढे आहेत. अशा कार्यालयांमधील लाचखोरी रोखण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून हे पथक तेथे गुप्त भेटी देतात. या भेटीदरम्यान कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडे विचारपूस केली जाते. एखादा अधिकारी कामाच्या बदल्यात पैसे घेत असेल, असे समजले तर सापळा रचून त्या अधिकाऱ्यावर कारवाई जाते.
* लाचखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी-कर्मचारी वर्ग पुरेसा आहे का?
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या क्षेत्रात ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे पाच जिल्हे येत असून या प्रत्येक जिल्ह्य़ात एक युनिट आहे. याशिवाय, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवी मुंबईत स्वतंत्र कार्यालय आहे. प्रत्येक युनिटला पुरेसे अधिकारी -कर्मचारी आहेत.  
ल्ललाचखोरांना शिक्षा व्हावी म्हणून आपण काय प्रयत्न करता?
न्यायालयात एखाद्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असेल तर त्या प्रकरणातील तक्रारदार, साक्षीदार, पंच आदींनी साक्ष फिरवू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. तेव्हा नेमके काय घडले होते, याची या सर्वाची उजळणी घेतली जाते आणि मार्गदर्शनही केले जाते. यामुळे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल गुन्ह्य़ात शिक्षेचे प्रमाण चांगले आहे.
* नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे यासाठी काय योजना राबवल्या जातात?
अनेकदा तक्रार कुठे आणि कशी करावी, याविषयी अनेक नागरिकांना फारशी माहिती नसते. यामुळे असे नागरिक तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. मात्र, या नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे म्हणून दरवर्षी भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह राबविला जातो. यामध्ये तक्रार कुठे आणि कशी करावी, याविषयी पथनाटय़, पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येते. तसेच वेगवेगळ्या प्रदर्शनात स्टॉलद्वारे जनजागृती केली जाते. तक्रार केली तर कारवाई होईल का, आपल्याला जाच होणार नाही ना, अशा शंकाही असतात. अशा नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे म्हणून त्यांच्या शंका दूर करून त्यांचा विश्वास संपादन केला जातो.
नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा