लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याने त्याला कान पकडून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. माफी मागण्यास लावणाऱ्या २० ते २५ जणांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. ‘आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा, आरोपीला तत्काळ अटक करा’ असे म्हणत त्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डायघर भागात राहणारा २१ वर्षीय मुलगा गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागात फळविक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. त्यामुळे फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलाविले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे मोबाईलवर चित्रीकरणही केले. या घटनेनंतर फळ विक्रेता त्याच्या सहकाऱ्यांसह मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार दाखल केली. तरुणाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी वाचा-ठाणे : जिल्हा “नियोजन समिती बैठकीच्या” प्रतीक्षेत, पालकमंत्र्यांच्या अभावी बैठकीला मुहूर्त नाही
दरम्यान, याच वेळी त्या फळविक्रेत्यासोबत आलेले २० ते २५ जण तरुणावर गुन्हा दाखल करण्याची घोषणाबाजी करु लागले. ‘आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा, आरोपीला तत्काळ अटक करा’ अशी आरडा-ओरड करू लागले. मुंब्रा पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.