देशाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात असते. त्यामुळे सुसंस्कारित, सजग, सुजाण, तरुण नागरिक तयार होणे हे देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. कुटुंब, पालक, शाळा व शिक्षक आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच हे उद्दिष्ट साध्य करता येते. त्यामुळे प्रत्येक घटकाचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
शालेय स्तरावर या दृष्टीने जागरूकपणे वैविध्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. संस्कारक्षम वयात आणि जडणघडणीच्या काळात (मुलांवर) विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करण्याचा व्यापक विचार यामागे केला जातो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन हे राष्ट्रीय सण साजरे करण्यामागे देशभक्ती जागृत व्हावी, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी, सामाजिक ऐक्य वाढीस लागावे, अशी व्यापक दृष्टी असते. शाळा-महाविद्यालयांतदेखील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्यवीरांचे मोल कळावे, देशभक्ती जागृत व्हावी, सामाजिक भान यावे आणि कुठेतरी जगण्याची दृष्टी मिळावी अशा व्यापक विचाराने राष्ट्रीय सणउत्सव जाणीवपूर्वक साजरे केले जातात.
ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय या सर्व विभागांचे विद्यार्थी प्रजासत्ताकदिन सोहळ्यात सहभागी होतात. साधारणपणे ध्वजवंदन, राष्ट्रगीत/ देशभक्तीपर गीते याने कार्यक्रमास प्रारंभ होतो. या कार्यक्रमाचे एकप्रमुख आकर्षण म्हणजे मुलामुलींचे संयुक्त बँडपथक. ध्वजवंदन हे या बँडच्या तालावर केले जाते. पाहुण्यांना मानवंदना, पाहुण्यांची ओळख, वार्षिक अंकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन, पाहुण्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण असा ढोबळपणे कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाच्या प्रमुख वैशिष्ठय़ांपैकी एक म्हणजे ठउउ चे संचलन. त्यानंतर फारसा आढळून न येणारी साधन कवायत. वेताच्या रिंग्ज, घुंगर काठी, डंबेल्स, रंगीबेरंगी रुमाल इ. साधने घेऊन इ. ५ वी ते ८ वीचे विद्यार्थी/ विद्यार्थिनींची कवायत पाहण्यासारखी असते. पिरॅमीडस्, रोपमलखांब, जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिके सर्वाची दाद घेऊन जातात. विद्यार्थ्यांना सामाजिक भान येण्याच्या दृष्टीने शेतकरी आत्महत्या, पाणी बचत इ. विषयांचा नृत्यातून वेध घेण्याचा प्रयत्न सांस्कृतिक कार्यक्रमांमधून केला जातो. दरवर्षी एक विषयाची निवड करून ‘प्रकाश’ हा वार्षिक अंक तयार केला जातो. ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्या. यांचे लेख, कविता समाविष्ट असतात. यंदा शिक्षण हा विषय असून, त्याचे प्रकाशन या दिवशी केले जाते. कार्यक्रमाची सांगता लेझीम पथकाच्या प्रात्यक्षिकाने होते.
ठाण्यातील श्रीसमर्थ सेवक मंडळाच्या शिवसमर्थ विद्यालयाच्या पटांगणात प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आणि गेले तीन तपाहून अधिक काळ ही परंपरा जोपासली जात आहे. शिवसमर्थ विद्यालयाच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे विद्यार्थी यात सहभागी होतात. झेंडावंदन, राष्ट्रगीत, अध्यक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण, देशभक्तीपर गीतांचे गायन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. देशभक्तीपर गीते शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वादनाच्या साथीने सादर केली जातात आणि त्यामुळे एक वेगळा अनुभव असतो. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यावर चांगले संस्कार अशा व्यक्तीच्या माध्यमातून व्हावेत असा उद्देश त्यामागे असतो. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होते.
ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ध्वजारोहण, संविधान, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, घोषणा, पाहुण्यांना मानवंदना, प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण, विविध प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. या कार्यक्रमात पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, प्रज्ञा भाषा केंद्र, क्रीडा संकुल, छात्रसेना, पालक, पालकशिक्षक संघ असे सर्व घटक सहभागी होतात आणि परस्पर सहकार्यातून कार्यक्रम साजरा केला जातो.
यावर्षी पूर्व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी स्काऊट गाइडच्या धर्तीवर ‘बनीची सलामी’ या स्वरूपात पाहुण्यांना मानवंदना देणार आहेत. बनी टमटोला हा अखिल भारतीय स्काऊट गाइडचा एक जुना उपक्रम जो काहीसा विस्मृतीत गेला आहे. त्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना पाहता येणार आहे. या सलामीबरोबरच गणपती गीतावर आधारित नृत्यातून गणपतीला वंदनही हे विद्यार्थी करणार आहेत. प्राथमिक विभागातर्फे कप बुलबुल परेड आणि एक समूहगीत सादर करण्यात येणार आहे.
माध्यमिक विभागातर्फे देशभक्तीपर गीते सादर करण्यात येतील. त्यानंतर छात्रसेनेतर्फे त्यांचे निवडक कॅडेटस् चित्रथरारक प्रात्यक्षिके सादर करतील. अतिरेक्यांचा हल्ला, कारगील युद्ध इ. विषय यामध्ये हाताळले जातात. शूटिंगच्या वेगवेगळ्या पोझीशन्सविषयीचे प्रात्यक्षिक केले जाते. क्रॉस मार्चिगची प्रात्यक्षिके हा एक संस्मरणीय अनुभव असतो. या कार्यक्रमासाठी सैन्यदलातील अधिकारी व्यक्तीस (कॅप्टन, कर्नल, ब्रिगेडिअर या हुद्दय़ावरील) आवर्जुन आमंत्रित करण्यात येऊन औचित्य साधले जाते. विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शौर्य, नेतृत्व, सामा. बांधीलकी, करिअर घडवण्यासाठी एक आव्हानात्मक क्षेत्र इ. दृष्टीने संस्कार व्हावेत, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अशा व्यक्तीची निवड केली जाते. जोशपूर्ण लेझीम पथकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होते. पन्नास विद्यार्थिनींचे हे लेझिम पथक आहे. स्त्री सबलीकरण, अंधश्रद्धा, स्वच्छ भारत, देशाची संस्कृती इ. महत्त्वपूर्ण विषयांचा या कार्यक्रमातून वेध घेण्याचा आणि विद्यार्थ्यांना संदेश देण्याचा, विचारप्रवृत्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.
ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा नं. ४ येथील (देवकर सरांच्या शाळेत) राजा शिवाजी विद्यालय या शाळेतही या दिवशी झेंडावंदन केले जाते. यावर्षी मेजर सुशांत जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. झेंडावंदन, पाहुण्यांना सलामी, देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम असा कार्यक्रम आयोजित केला जातो. या निमित्ताने गेली ३-४ वर्षे सामा. प्रबोधनाचे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांची रॅली काढली जाते. ‘स्वच्छ भारत’ या विषयाबरोबर, लेक वाचवा, लेक शिकवा, पाणी बचत, पर्यावरण जतन संवर्धन इ. विषयांवरील प्रबोधनाच्या उद्देशाने रॅलीत पथनाटय़े सादर केली जातात. इ.४थी ते १०वीचे सर्व विद्यार्थी रॅलीत सहभागी होतात आणि त्यांच्या हातात घोषणांचे फलक असतात. चौकाचौकांत घोषणा देत फिरताना समूहगीते, देशभक्तीपर गीते सादर केली जातात. लेझीम पथकाच्या माध्यमातून हे परिणामकारकरित्या लोकांपर्यंत पोचवले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा