कल्याण : पावसाचे प्रमाण कमी होताच कल्याण, डोंबिवली शहरांतर्गत आणि परिसरातील रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट परिसरात पसरत आहेत. संध्याकाळची कुंद हवा आणि त्यात धूळ उडत असल्याने प्रवासी हैराण आहेत. सिमेंट, माती मिश्रित ही धूळ आरोग्याला हानीकारक असल्याने बहुतांशी वाहन चालक, प्रवासी तोंडाला रुमाल, मुखपट्टी लावून प्रवास करताना दिसत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्डयांमध्ये मागील तीन महिन्याच्या कालावधीत पालिकेच्या ठेकेदाराने माती, सिमेंट टाकून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले. यापूर्वी सतत पडत असलेल्या पावसामुळे माती, सिमेंट जागीच दबून राहत होते.
आता पाऊस कमी होताच खड्डे, रस्त्यांवर टाकण्यात आलेली माती, सिमेंटचे मिश्रण सुकून या रस्त्यांवरुन वाहनांची वर्दळ सुरू असल्याने हा धुरळा दिवसभर हवेत उडतो. संध्याकाळी सहा नंतर हवेत गारवा आणि वातावरण कुंद होत असल्याने रस्त्यावरील उडणारी धूळ थरांमध्ये जमा होऊन त्याचे पट्टे परिसरात पसरतात. या रस्त्यांच्या भागात असलेल्या गृहसंकुलातील रहिवासी धुळीने सर्वाधिक हैराण आहेत. घरातील खिडक्या बंदिस्त करुनही धूळ घरात येते, असे रहिवाशांनी सांगितले. कल्याण जवळील म्हारळ, कांबा भागात, कल्याण शिळफाटा रस्ता, पुना लिंक रस्ता, चिंचपाडा, नेतिवली मलंग रस्ता, डोंबिवलीतील मानपाडा ते शिवाजी नगर रस्ता, घरडा सर्कल ते एमआयडीसी, बंदिश हाॅटेल ते टाटा नाका, शहरांतर्गत रस्ते, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत हवेत धुळीचे थर दिसतात.
हवेतील या प्रदुषणामुळे अनेक प्रवाशांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. नियमित दुचाकीवरुन प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी आजारी पडत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील डाॅक्टरांनी दिली. म्हारळ, कांबा दरम्यान चार ते पाच किमी टप्प्यात खड्डेमय रस्ता आहे. या रस्त्यावरुन वाहने संथगतीने चालविली जातात. त्यामुळे वाहन चालक, प्रवासी या भागात उडणाऱ्या धुळीने हैराण आहेत. या पाच किमीच्या अंतरात वाहने धुळीने भरुन जातात. या रस्त्यावरुन नियमित प्रवास करणारे दुचाकी स्वार आपल्या पेहरावाच्या कपड्यांवर संरक्षित कोट घालून मग मुरबाड दिशेेने प्रवास करतात. काही प्रवासी गोवेली, टिटवाळा मार्गे कल्याणचा प्रवास करतात, असे प्रवाशांनी सांगितले.