लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची बाजारांमध्ये गर्दी होत असताना यंदा फटाक्याच्या बाजारात पर्यावरणपूरक फटाक्यांच्या खरेदीसाठी आग्रह वाढू लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मोठया आवाजाच्या फटाक्यांच्या खरेदीचे प्रमाणही कमी असून यंदा आपटी बॉम्बची विक्रि मात्र जोरात असल्याचे ठाण्यातील कोपरी या फटाक्यांच्या सर्वात मोठया बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले.

दिवाळ सणाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे. दिवे, पणत्या, कंदील, कृत्रिम फुलांच्या माळा, कपड्यांच्या दुकानांमध्ये नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपुजन तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. असे असले तरी कमी आवाजाच्या आणि पर्यावरणपूरक फटाक्यांच्या वापराकडेही नागरिकांचा ओढा वाढत आहे, अशी माहिती कोपरी भागातील दिनेश वारिंबे या फटाका विक्रेत्याने सांगितले. आकाशातील मोठ्या आवाजाचे आणि वायू प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षा जमिनीवरील फटाके खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाचे प्रतिबिंब दि‌वाळीच्या कंदिलावरही

फटाक्यांचा बाजारही गर्दीने फुलला

मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरामध्ये प्रदुषणाचे प्रमाण वाढल्याने उच्च न्यायालयाने यंदा फटाके फोडण्याच्या वेळाही निश्चित केल्या आहेत. तसेच वायू प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या वेगवेगळ्या फटाका बाजारांमध्ये खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून खरेदीदारांची गर्दी वाढताना दिसत आहे. ही खरेदी करताना अनेक नागरिकांचा कल पर्यावरणपूरक फटाक्यांच्या खरेदीकडे अधिक दिसत आहे. फुलबाजे, भूईचक्र, पाऊस, आपटी बॉम्ब या फटाक्यांना नागरिकांची अधिक मागणी आहे, अशी माहिती कोपरीतील फटाका विक्रेत्यांनी दिली. ग्राहक फटाके खरेदी करताना कमी आवाजाच्या फटाक्यांची मागणी करत असल्याचे विक्रेते रमेश खत्री यांनी सांगितले. लहान मुलांमध्ये फटाक्यांचे आकर्षण सर्वाधिक असते. पालक सतर्कता बाळगत पर्यावरणपूरक फटाके खरेदी करत असल्याचे खत्री यांनी सांगितले.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या दरात २० ते ४० टक्के वाढ झाली आहे. तरी देखील फटाके खरेदीस नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच आपटी बाॅम्ब आणि पाऊस या फटाक्याच्या प्रकारास ग्राहक अधिक पसंती दर्शवत असल्याचे विक्रेते निहार देशमुख यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peoples preference for purchasing eco friendly crackers mrj
Show comments