भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा खोटी पटसंख्या दाखवून त्या आधारे शाळेत परस्पर शिक्षक भरती करतात. या माध्यमातून शासनाची फसवणूक करतात, शाळेला अनुदान प्राप्त करून घेतात. जिल्हा परिषद ते खासगी शाळांमधील हे गैरप्रकार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ‘कायमस्वरुपी शिक्षण क्रमांक’ (पर्मनन्ट अकाउंट क्रमांक-पेन) देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्मनन्ट अकाऊंट क्रमांक (पेन) देण्यात येणार आहे. हा क्रमांक देण्यासाठी शिक्षण संस्थांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची नोंदणी यु-डायस प्लसच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी यु-डायस प्लसवर होईल. त्यांनाच ‘पेन’ क्रमांक मिळणार आहे, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा-बदलापुरकरांचे लोकलहाल वाढणार; उदवाहन, जिन्यांसाठी फलाट क्रमांक एक आणि दोन बंद होणार
पेन क्रमांकामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती एकाच साधनाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणार आहे. प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला पूर्वी शिक्षण घेत असलेल्या शाळेतील नोंदणी क्रमांक घेऊन नवीन प्रेवशासाठी धावपळ करावी लागणार नाही. नवीन प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे नाव यु-डायस पध्दतीने तपासले की त्याची सर्व शैक्षणिक माहिती एकत्रितपणे तांत्रिक पटलावर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी शाळेत नसताना पट वाढविण्यासाठी शाळेने चुकीची नावे घुसवली. अशा प्रकरणी यापुढे कारवाई होणार असल्याने कोणीही शाळा यापुढे विद्यार्थ्यांची बनावट पटसंख्या दाखवून पट वाढविण्याचा प्रयत्न करणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे प्रणाली
यु-डायस ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असलेली शाळा, पायाभूत सुविधांची माहिती, शिक्षक, विद्यार्थी संख्या, शाळेच्या आस्थापनेवरील पदे आणि रिक्त पदे, शाळेसाठी आवश्यक असलेली पटसंख्या, शाळेतील विद्यार्थी सुविधा याची माहिती एकत्रितपणे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा-शहापूरात मध्यान्ह भोजनातून १०९ विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
कोणत्या शाळांचा समावेश
जिल्हा परिषदेच्या पहिली पासुनच्या शाळा, राज्य परीक्षा मंडळ, केंद्रीय परीक्षा मंडळ, आयबी, सीबीएसई, सीआयएसईएस, आयसीएसई या शाळेतील विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी शिक्षण नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. पेन क्रमांक असलेला विद्यार्थी शाळ बाह्य झाला असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला तातडीने त्याच्या वयोमानाप्रमाणे शाळेत दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पेनच्या संगणकीकृत माहितीमुळे विद्यार्थ्याची एकत्रित नवी माहिती चालू शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी त्याचा पेन क्रमांक कायम राहणार आहे.
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात इयत्ता पहिली ते बारावीचे ६८ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. त्यांना पेन क्रमांक देण्याची प्रक्रिया शिक्षण संस्थांनी सुरू केली आहे. ज्या विद्यार्थ्याचे आधार क्रमांक नाहीत. काही शाळांनी अनेक विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले शुल्क भरणा केले नाही म्हणून अडून ठेवले आहेत. त्यांना पेन क्रमांक देण्यात दुसऱ्या शाळांना अडचणी येत आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाने मार्ग काढण्याची मागणी होत आहे.
शहापूर तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना यु-डायस प्रणालीतून पेन क्रमांक देण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्याची एकत्रित माहिती यामुळे संकलित होणार आहे. -भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, शहापूर.