बदलापूर: मुरबाड तालुक्यातील तळेगाव येथे राहणारे रवींद्र चिंधू देशमुख (५०) यांचा बुधवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. देशमुख खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. तेथून परतल्यावर देशमुख यांना उष्माघाताचा त्रास झाला. उष्माघातामुळेच देशमुख यांचा मृत्यू झाल्याचा दावा देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. परिणामी खारघर दुर्घटनेत नोंद असलेल्या मृतांच्या यादीत देशमुख यांचा समावेश करण्यास स्थानिक प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. हा मृत्यू घटनास्थळी झाला नसल्याचे कारण दिले जाते आहे.
हेही वाचा… ठाण्यातील खाडीवर राडारोड्याचा भराव, मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट होऊनही शासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष
हेही वाचा… Maharashtra News Live Today : बारसू प्रकल्पाबाबत नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?
खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे काही श्री सेवकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यांची प्रकृती अत्यवस्थ होती त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर काही श्री सेवकांनी आहे त्या स्थितीत आपले घर गाठले. त्यातील काही श्री सेवकांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी आपापल्या परीने उपचार घेतले. यात मुरबाड तालुक्यातील तळेगाव येथे राहणारे रवींद्र चिंधु देशमुख यांचाही समावेश होता. पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी रविंद्र देशमुख जीप घेऊन गेले होते. आणखी काही श्रीसेवकही त्यांच्यासोबत होते. पुरस्कार सोहळ्यात देशमुख यांनाही काही प्रमाणात त्रास जाणवला. कार्यक्रम संपताच रविवारी संध्याकाळी देशमुख घरी परतले. मात्र दुसऱ्याच दिवशी सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मुरबाडमधील स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या नातेवाईकांनी देशमुख यांना उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराने फरक पडत नसल्याने त्यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र देशमुख यांच्या मृत्यूची नोंद खारघर दुर्घटनेतील मृतांमध्ये केला जाणार नसल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. याबाबत मुरबाड तहसील प्रशासनाशी देशमुख यांच्या नातेवाईकांनी संपर्क केला होता. मात्र त्यांचा समावेश त्या यादीत केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा… अंबरनाथमध्ये चार ‘आपला दवाखाना’; महाराष्ट्र दिनी होणार शुभारंभ, मिळणार मोफत उपचार
प्रतिक्रिया: देशमुख यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. मात्र घटनास्थळाहून ते घरी आले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली असल्याचे समजले. त्यामुळे त्यांचा समावेश खारघर दुर्घटनेतील मृतांच्या यादीत होणार नाही. – संदीप आवारी, तहसीलदार, मुरबाड