डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी एका तरूणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सकाळी एका ६० वर्षाचा प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चार आणि पाचच्या दरम्यान लोकलमधून रेल्वे मार्गाच्या बाजुने उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय मुरगळून जखमी झाला. पायाला दुखापत झाल्याने त्याला डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा जवान आणि स्थानक मास्तर यांनी मदत करून उपचारासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविले. मायकल जाॅन्सन (६०) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत तुडुंब गर्दी असते. फलाटावर पाय ठेवण्यास जागा नसते. लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.

प्रवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी कल्याण बाजूकडून एक प्रवासी सीएसएमटीकडे जाणाऱ्या अतिजलद लोकलने येत होता. त्याला डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरायचे होते. डोंंबिवली रेल्वे स्थानकातील तुडुंब गर्दीमुळे फलाट क्रमांक पाचवर त्याला उतरता आले नाही. मायकल यांनी आपण डोंबिवलीला उतरलो नाहीतर लोकल थेट ठाणे रेल्वे स्थानकात थांबणार असल्याने ठाण्याला जाऊ, असा विचार करून घाईघाईने डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गाच्या बाजुने फलाट क्रमांक चार आणि पाचच्या मध्यभागी उतरण्याचा निर्णय घेतला.
लोकलचे पायदान आणि रेल्वे मार्ग यांच्यात चार ते पाच फूटाचे अंतर असते. त्यामुळे लोकलमधून उतरताना मायकल यांनी रेल्वे मार्गात उडी मारली. उडी मारल्यानंतर रेल्वे मार्गातील खडी आणि तेथील खळग्यात त्यांचा पाय मुरगळला. त्यांच्या पायाला दुखापत झाली. ते काही वेळ रेल्वे मार्गात रुळाच्या बाजुला बसून होते. तेवढ्यात गस्तीवरील रेल्वे सुरक्षा जवान, काही पादचाऱ्यांनी मायकल यांना रेल्वे मार्गातून फलाटावर घेतले. डोंबिवली रेल्वे स्टेशन मास्तर बिटू गुप्ता, रेल्वे सुरक्षा जवान यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने मायकल यांना अधिक उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हे ही वाचा…टोलमुक्तीनंतर आनंदनगर टोलनाक्याची रचना बदलणार

मायकल नावाचा प्रवासी फलाट क्रमांक चार आणि पाचमधील रेल्वे मार्गात लोकलमधून उतरताना पडला होता. पण तो मुंबईकडून की मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधून पडला होता हे समजले नाही. रेल्वे सुरक्षा जवानाने त्याला रेल्वे मार्गात पडल्याचे पाहिले आणि थेट तो त्यांना आपल्या कार्यालयाकडे घेऊन आला. त्याला तातडीने उपचारासाठी पालिका रुग्णालयात पाठविले, अशी माहिती स्टेशन मास्तर बिटू गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. प्रवाशांनी गर्दी असली तरी जीव धोक्यात घालून लोकलमधून रेल्वे मार्गाच्या बाजुने उतरू नये, असे आवाहन स्टेशन मास्तर गुप्ता यांनी केले आहे.

हे ही वाचा…माजी प्र-कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांचे निधन

मंगळवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधील गर्दीमुळे डब्यात घुसता न आल्याने आयुष दोशी या तरूणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. दिवसेंदिवस लोकलची गर्दी वाढत असल्याने या गर्दीला कंटाळून मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या अनेक नोकरदारांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे.