एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर शेरेबाजी

शिवसेना-भाजपची युती तुटताच या दोन्ही पक्षांतील ठाण्यातील ‘नेटकरी’ समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर जोरदार चिखलफेक करत असतानाच डोंबिवलीत राबविण्यात आलेल्या ‘से नो टू शिवसेना’ या फेसबुक पानाच्या धर्तीवर ठाण्यात काही अज्ञातांनी सुरू केलेले ‘शिवसेना नको बाबा’ हे पान वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर हल्लाबोल करताना शिवसेनेतील ‘गुंडां’ची यादीच या पानावर सचित्र प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामुळे शिवसेनेत कमालीचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. हे असले छुपे वार भाजपकडूनच केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून भाजपने मात्र या पानाशी आमचा संबंध नाही, अशी भूमिका घेतली आहे.

कल्याण, डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हद्दपार करण्यासाठी भाजपने काही महिने अगोदर ‘से नो टू शिवसेना’ हे पान सुरू केले होते. महापालिकेतील गैरकारभार, नेत्यांचा मनमानी कारभाराची इत्थंभूत माहिती या पानावरून नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असे. युती तुटताच कल्याण डोंबिवलीचा हाच ऑनलाइन पॅटर्न ठाण्यातही राबविण्याची शक्यता येथील राजकीय वर्तुळात व्यक्त होत होती. असे असताना एका छुप्या गटाने फेसबुक संकेतस्थळावर ‘शिवसेना नको बाबा’ या नावाने तयार केलेल्या पानामुळे या दोन्ही पक्षांतील वितुष्ट टोकाला पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर एकीकडे शुकशुकाट असला तरी ‘शिवसेना नको बाबा’ या पानावर मात्र ‘शिवसेनामुक्त महाराष्ट्र’, ‘गुंडगिरीमुक्त महाराष्ट्र’, ‘भयमुक्त महाराष्ट्र’ असे मथळे टाकून शिवसेनेवर उघड टीका सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या आधिपत्याखाली असलेल्या महापालिकांमधील घोटाळय़ांवर येथून टीकास्त्र सोडले जात आहे.

सेनाही गुंडांचीच..

भाजपमध्ये काही गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या नेत्यांनी प्रवेश केल्यावर भाजप गुंडांचा पक्ष आहे, अशी जोरदार टीका सर्वच पक्षांनी केली. मात्र ‘शिवसेना नको बाबा’ या पानावरून ठाण्यातील शिवसेनेतील गुंडांची यादी छायाचित्रासकट प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये राजा गवारी, नरेश म्हस्के यांचा उल्लेख गुंड असा करण्यात आला असून त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवली निवडणुकीदरम्यान भाजपने अशा प्रकारे समाजमाध्यमांवरून टीका करण्याचे काम केले होते. भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने अशा प्रकारे कृत्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

– नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना

फेसबुकवर सुरू असलेल्या ‘शिवसेना नको बाबा’ या पानाशी आमचा कोणताही संबंध नाही. भाजप नेहमी सकारात्मक प्रचाराला प्राधान्य देते. हे असले प्रकार आमच्या नावे खपविण्याची खेळी आहे.

– संजय केळकर, भाजप आमदार

Story img Loader