शिवसेनेचे नगरसेवक श्रेयस समेळ व त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण करताना भ्रमणध्वनी आणि सोनसाखळी चोरली असून त्यांच्याकडून आपल्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार हॉटेल मालकाने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली आहे.
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावर काळा तलाव जवळ रमेश वाव्हळ यांचे एकवीरा हॉटेल आहे. हॉटेलच्या आजूबाजूने पालिकेची गटाराची कामे सुरूआहेत. या कामासाठी हॉटेलचा काही भाग लागणार आहे. हॉटेललगत गटाराचे काम करावे, असे आपण ठेकेदाराला सुचविले आहे. गेल्या आठवडय़ात समेळ हे बांधकामाच्या ठिकाणी आले. त्या वेळी गटाराचे काम कसे होत नाही, असे म्हणून समेळ यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आपणास बेदम मारहाण केली. आपला भ्रमणध्वनी व सोनसाखळी त्यांनी काढून घेतल्याचा आरोप वाव्हळ यांनी तक्रारीत केला आहे.
हॉटेल मालकाने केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. प्रभागात विकास कामे झाली पाहिजेत. ती जर प्रत्येक रहिवासी, व्यापारी अडवू लागला तर, पालिकेने विकास कामे करायची कशी. हॉटेल मालकाने केलेल्या तक्रारीमागे राजकीय शक्ती आहे. समोरचे जे हरलेत त्यांना पराभव सहन झालेला नाही. त्यामुळे आपल्या कामात अडथळे आणण्यासाठी, आपल्याला गुन्हेविषयक प्रकरणात अडकवून ठेवण्यासाठी हे उद्योग सुरूआहेत. आमच्यावर साधी अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद नाही. मग आम्ही कसले दरोडे टाकणार?
श्रेयस समेळ, नगरसेवक, कल्याण</strong>