खाणीत सापडलेल्या हिऱ्याला जेव्हा कसबी कारागिराकडून पैलू पाडले जातात तेव्हाच त्याचे सौंदर्य झळाळून उठते. ठाण्यातील दुर्बल स्तरातील हुशार मुलांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समता विचार प्रसारक संस्था नेमके याच स्वरूपाचे कार्य करीत आहे.
 दुर्बल स्तरातील मुलांना मुख्य समाजप्रवाहात आणून त्यांना सध्याच्या स्पर्धात्मक जगात खंबीरपणे उभं राहण्यासाठी समता विचार प्रसारक संस्था २३ वर्षे कार्यरत आहे. अशा मुलांसाठी बालनाटय़ संस्था आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या सहकार्याने नाटय़जल्लोष हा उपक्रम राबविण्यात आला. ७ ते १७ वयोगटातील या दुर्बल स्तरातील मुलांमधील कलागुण, गुणवत्ता सर्वानाच सुखद धक्का देऊन गेली. तेव्हा ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी ठोस काम करण्याची निकड प्रकर्षांने संस्थेला जाणवू लागली. प्रसिद्ध रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी या मुलांसाठी अनौपचारिक पद्धतीने मार्गदर्शन करणारी शिबीर मालिका आयोजित करावी, असे सुचविले. संस्थेने त्या दृष्टीने सर्वसंमतीने अभ्यासपूर्वक एक आराखडा तयार केला. उन्हाळी शिबीर मालिकेच्या माध्यमातून वंचित स्तरातील मुलांमधील गुणांना वाव मिळावा, त्यांच्या जगापलीकडील जगाचा अनुभव द्यायचा आणि उन्हाळी सुट्टीचा बालवयातला आनंद उपभोगायला द्यायचा अशा व्यापक हेतूने या व्यक्तिमत्त्व विकास शिबीर मालिकेची रूपरेखा तयार झाली.
समाजातील सुस्थितीतली मुले सुट्टीत वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क, मल्टिप्लेक्स, सीसीडी, डॉमिनोज, ट्रेक, शिबिरे असे वेगवेगळे अनुभव घेतात आणि भरपूर मजा करतात; पण येऊर आदिवासी पाडा, किसननगर, लोकमान्यनगर खार्टन रोड, सफाई कामगार वस्ती, नळपाडा या वस्तीतल्या मुलांसाठी हे सगळे स्वप्नवतच आहे. ज्या पालकांसाठी रोजचे जगणे हेच संघर्ष आहे ते मुलांना सुट्टीची अशी मजा देण्याचा विचारही करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना वेळही नाही आणि पैसेही नाहीत. त्यामुळे सुट्टीत अशी खूप मजा करता येते. नवीन काही अनुभवता येते, शिकता येते हेही त्यांना माहीत नाही.
 समाजातील या दुर्बल स्तरातील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण अनुभव व त्यांना भावेल, रुचेल आणि त्यात ते सामावले जातील, अशा पद्धतीने द्यायचे निश्चित झाले. ठाण्यातील नळपाडा, किसननगर, लोकमान्यनगर, येऊरमधील आदिवासी पाडे, खारटन रोड इ. विविध वस्त्यांमधील पालकांशी शिबीरविषयक बोलणी सुरू झाली. स्टेडिअमवरील समता कट्टय़ावर ४ मे ते ११ जून या काळात २ ते ५ वेळेत कृतीसत्राचे आयोजन केले. पूर्णपणे नि:शुल्क स्वरूपाच्या या शिबिरामध्ये ४५ मुले सहभागी होण्यासाठी तयार झाली आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांचा, सभासदांचा उत्साह वाढला. उद्घाटनाच्या सत्रात प्रतिभाताई मतकरींनी मुलांशी संवाद साधला.
   आठवडय़ातून २ ते ३ दिवस मुलांसाठी कृती सत्राचे आयोजन करण्यात येत असे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग कोलाजकाम, शोभेच्या वस्तू तयार करणे, बालनाटय़ पाहणे, छोटीशी सहल अशी सत्रे असत आणि मग थोडा वेळ शेवटी नृत्याच्या सत्राने त्या दिवसाची सांगता होत असे. मुलांना रोज खाऊ आणि सरबत आवर्जून दिले जात असे. मुलांनी सायली घोटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दगडावरील पेंटिंग कोलाजवर्कचा अनुभव घेतला. वर्षांताई गद्रे यांच्याकडून कागदाच्या शोभेच्या वस्तू, पिशव्या करायची कला शिकली. अंधश्रद्धा निर्मूलनविषयक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वंदनाताई शिंदे यांनी त्यांना अंधश्रद्धा म्हणजे काय ते समजावून दिले. विश्वास कोर्डे यांनी सोप्या प्रयोगांमधून दैनंदिन जीवनातील विज्ञान समजावून सांगितले. अस्मिता तारेघटकर यांच्याकडून फॅब्रिक पेंटिंग, ओरोगामी या कला शिकण्याचा प्रयत्न मुलांनी केला. अभिषेक साळवी यांनी त्यांना नृत्यविषयक प्रशिक्षण दिले. या शिबीर मालिकेच्या समारोपाचा कार्यक्रम ११ जून रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ९ वाजता आयोजिण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नाकर व प्रतिभा मतकरी उपस्थित राहणार आहेत. विविध कृतीसत्रात सहभागी झालेल्या शिबिराìथनी केलेल्या कलाकौशल्याचे नमुने रंगायतन येथील एका प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
  या शिबीर मालिकेत सहभागी झालेल्या मुलांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव होता आणि ते त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्या देहबोलीतून, चेहऱ्यावरील हास्यातून अनुभवता येत होते. कल्पनेपलीकडील हातात गवसल्यावर ते मिळवण्याची, टिपून ठेवण्याची, अधिकाधिक आत्मसात करण्याची ऊर्मी, धडपड सर्वानाच अनुभवता येत होती.
   मुलांचा सर्वागीण विकास, व्यक्तिमत्त्व विकास या गोष्टी समाजातील विशिष्ट वर्गापुरत्याच मर्यादित राहतात. दुर्बल स्तरातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना स्पर्धेच्या या जगात उभं राहण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच विविध कृतीसंत्राच्या माध्यमातून वंचित मुलांना त्यांच्या जगापलीकडचे जग दाखवण्याचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा