महाराष्ट्रीय सांस्कृतिक परंपरांमध्ये नाटय़ चळवळीचा गौरवपूर्ण उल्लेख होत असला तरी बालनाटय़ रंगभूमी मात्र तुलनेने उपेक्षितच राहिली. फार थोडय़ा संस्था मुलांसाठी सातत्याने नाटके करीत राहिल्या. डोंबिवलीतील श्रीकला संस्कार संस्था त्यापैकी एक. याच संस्कारातून वेध अ‍ॅक्टिंग अ‍ॅकॅडमीचा जन्म झाला. बेळगाव आणि सोलापूर येथे झालेल्या बालनाटय़ संमेलनांमध्ये संस्थेने बालनाटय़े सादर केली. नाताळच्या निमित्ताने डोंबिवलीत या संस्थेने बाल रंगोत्सव भरविला आहे. त्यानिमित्ताने या चळवळीचा थोडक्यात परिचय..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रमिक अभ्यासक्रमासोबत शालेय वयातील मुलांच्या अंगभूत अभिनय कलेला वाव मिळवून देण्याचे तसेच त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचे काम डोंबिवलीतील श्रीकला संस्कार संस्था गेली ३३ वर्षे सातत्याने करीत आहे. दिवंगत सुधा साठे आणि दीपाली काळे यांनी या संस्थेची स्थापना केली.

त्याच संस्कारातून पुढे मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ थिएटर आर्ट्स केलेल्या संकेत ओक याने १० जुलै २०१० रोजी वर्षभराचा अभिनय प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम असलेली वेध अ‍ॅक्टिंग अ‍ॅकॅडमी  सुरू केली. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटय़ाचे धडे गिरविल्यानंतर त्यांच्याकडूनच स्फूर्ती घेत डोंबिवलीत अभिनय प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. त्याला मधुरा आपटे, अद्वैत ओक, चैताली धोपटकर, अनुजा मोहोरे, कविता चिपळूणकर, मयुर जयसिंग, सौरभ सोहोनी, वृषांक कवठेकर, नीलम घैसास, नीलेश खरे, करण बिच्छु  या समवयस्कांनी मोलाची साथ दिली. बालनाटय़ाच्या माध्यमातून डोंबिवलीत नाटय़ चळवळ उभी करण्याचा ध्यास या सर्वानीच घेतला होता. त्यातूनच पालकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि पहिल्याच वर्षी अनेक मुलांनी यात सहभाग घेतला. या प्रशिक्षणाचा विशिष्ट अभ्यासक्रम आहे. त्यात दिग्गज रंगकर्मी मुलांना मार्गदर्शन करतात. सहा ते पंधरा वर्षे तसेच सोळा ते पंचेचाळीस र्वष अशा वयोगटातील विद्यार्थ्यांना वेधमध्ये अभिनय प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जातात. थिएटरच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास हाच मूळ हेतू ठेवून वेध अभिनय देत आहे. त्यात कथाकथन, थिएटर बेसिक, व्हॉईस कल्चर, छायाचित्रण, मेकअप, डबिंग, उच्चार, निवेदन, नृत्य, कॅमेरा, संवादफेक, देहबोली या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रत्येक विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना संस्थेत बोलावले जाते.

‘वेध’मध्ये आतापर्यंत वामन केंद्रे, रवी जाधव, पुरुषोत्तम बेर्डे, विजय केंकरे, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, इला भाटे, सतीश राजवाडे, डॉ. गिरीश ओक, ललित प्रभाकर, शशांक केतकर, श्रीरंग गोडबोले, लीना भागवत, कुशल बद्रिके, भाऊ कदम, महेश लिमये, चिन्मय मांडलेकर, उदय सबनीस, वर्षां दांदळे यांसारखी उत्तम कलाकार मंडळी मार्गदर्शन करण्यासाठी आली आहेत.

या मार्गदर्शनासोबतच त्यांच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करताना उपयोग व्हावा यासाठी लघुचित्रपट, बाल रंगोत्सव, बालनाटय़ स्पर्धा, एकपात्री स्पर्धा याही गोष्टींचा विशेष समावेश असतो.

मुलाचे प्रशिक्षण झाल्यावर थेट नाटय़गृहात त्याचे सादरीकरण होते. त्यात निवेदनापासून सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवरच असतात. यंदा प्रशिक्षणार्थी मुलांनी सामाजिक विषय घेऊन दोन लघुचित्रपटसुद्धा केले आहेत. एकूणच या उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

वेध अ‍ॅक्टिंग अ‍ॅकॅडमीने डोंबिवली, ठाण्यापासून सुरू केलेला अभिनय प्रशिक्षणाचा प्रवास पुण्यापर्यंत नेलाच. शिवाय विशेष म्हणजे वेधपासून प्रेरणा घेऊन आता कुडाळ आणि औरंगाबादरमध्ये अभिनय प्रशिक्षणाच्या कार्यशाळा सुरू झाल्या आहेत. ‘वेध’ कडून बेळगावच्या नाटय़ संमेलनात दोन बालनाटय़े सादर झाली. नुकत्याच सोलापूर येथे झालेल्या पहिल्या बालनाटय़ संमेलनातही वेधकडून बालनाटय़े सादर झाली आहेत. राज्यस्तरीय स्पर्धातून चाळीसहून अधिक पारितोषिक  वेधच्या टीमला मिळाली आहेत. याशिवाय ओरिसा आणि डेहराडून येथे राष्ट्रीय महोत्सवाचा अध्यक्षीय चषक मिळून १३ पारितोषिकेही मिळाली आहेत.

व्यावसायिक क्षेत्रातही ठसा

‘वेध’मध्ये शिकणाऱ्या या बालकलाकारांनी मनोरंजन क्षेत्रातही खूप मोठी झेप घेतलेली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून ते झळकले आहेत. ‘या वळणावर’ मालिका आणि ‘अवताराची गोष्ट’ चित्रपटातील मिहिरेश जोशी, ‘तू तिथे मी’मधील आभा बोडस, ‘तू माझा सांगती’मधील स्वानंद शेळके, ‘अस्मिता’, ‘तू माझा सांगती’ मालिकेतील मल्हार अटकेकर, मैथिली पटवर्धन, ‘परतू’ चित्रपटातील चिराग गरुड, ब्रव्हहार्ट चित्रपटातील अथर्व तळवलकर, चित्रगोष्टी मालिकेतील रुग्वेद पुराणिक आदींचा त्यात समावेश आहे. ‘खो खो’ या चित्रपटात तर ‘वेध’मधील पाच ते सहा जणांची टीम आहे. शिवाय कच्छ, ‘देवो के देव महादेव’ यामध्ये अजिंक्य लोंढे आदींनी व्यावसायिक क्षेत्रात ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality development can change by acting also