लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : भिवंडी शहराचा पुढील २० वर्षांचा विचार करून पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारुप विकास आराखड्यातील विविध आरक्षणे बदलण्याची प्रलोभने दाखविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरक्षण बदलाची प्रलोभने दाखविणाऱ्या दलालांचा शहरात सुळसुळाट झाल्याने पालिका प्रशासन हैराण झाले आहे. नागरिकांची फसवणुक करणाऱ्या अशा दलालांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
भिवंडीत शहराचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणामुळे पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. यामुळे भिवंडी शहराचे पालिका प्रशासनाने प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेने हा आराखडा तयार केला आहे. पुढील २० वर्षांचे म्हणजेच, २०४३ सालापर्यंतचा विचार करून हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या भुखंडावर कोणती नागरि सुविधा निर्माण करायची, याचे नियोजन करण्यात आले आहे. भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी हा प्रारूप विकास आराखडा नुकताच प्रकाशित केला. या आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत दत्तनगर मधील कमानी हटविल्या
एकीकडे पालिकेकडून नागरिकांच्या हरकती व सुचना निकाली काढून हा आराखडा मंजुर करण्यासाठी प्रक्रीया सुरू केली असतानाच, दुसरीकडे या आराखड्याच्या माध्यमातून काही दलालांनी नागरिकांची दिशाभूल करून फसवणुक करण्यास सुरूवात केली आहे. विकास आराखड्यातील आरक्षणे, रस्ते यासह इतर काही नागरी सुविधासंदर्भात आवश्यक बदल करून देण्यासाठी दलालांकडून नागरिकांना प्रलोभने दाखवून त्यांची दिशाभूल केली जात आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रारी येऊ लागल्या असून यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या दलालांना चाप लावण्यासाठी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी कठोर पाऊले उचलली असून नागरिकांची फसवणुक करणाऱ्या अशा दलालांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे.
विकास आराखड्याबाबत प्रलोभने देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे नागरिकांची फसवणुक करणाऱ्यांवर कायदेशीर पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. -अजय वैद्य, आयुक्त, भिवंडी महापालिका.