डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात एका पाळीव श्वानाच्या मालकाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका वडील आणि त्याच्या चार वर्षाच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच, रागाच्या भरात सम्राट चौकातील भटक्या कुत्र्यांना हातामधील काठीने निर्दयपणे मारहाण केली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
रामदास घोलप असे पाळीव श्वान मालकाचे नाव आहे. मनोज मधुकर सत्वे (३६) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगरमधील रेतीबंदर रस्त्यावरील एका सोसायटीत कुटुंबीयांसह राहतात. विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रारदार सत्वे यांनी रामदास घोलप यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार मनोज सत्वे हे आपल्या चार वर्षांच्या मुलासह मंगळवारी सकाळी पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौक भागात बाजारात फळे खरेदीसाठी आले होते. एका विक्रेत्याकडून मनोज सत्वे फळे खरेदी करत होते. त्यावेळी आरोपी रामदास घोलप हे त्या भागात आपला पाळीव श्वान फिरण्यासाठी घेऊन आले होते. त्यांच्या हातात श्वानाला धाक दाखविण्यासाठी काठी होती.
मनोज सत्वे फळे खरेदी करत असताना, त्यांच्या बाजुला रामदास घोलप आपला पाळीव श्वान घेऊन फिरत होते. अचानक भटकी कुत्री आणि घोलप यांचा पाळीव श्वान एकमेकांवर भुकूंन, एकमेकांच्या अंगावर धाऊन जाऊ लागली. यावेळी बाजारपेठेतील नागरिक, विक्रेते ही कुत्री आपल्या अंगावर येतील म्हणून पळू लागली. या पळापळीच्यावेळी रामदास घोलप यांचा पाळीव श्वान अचानक तक्रारदार सत्वे यांच्या चार वर्षांच्या मुलाच्या अंगावर धाऊन आला. या प्रकाराने वडील मनोज सत्वे घाबरले. त्यांनी तात्काळ मुलाला स्वत:जवळ ओढून घेतले आणि सावरले. त्यांनी पाळीव श्वानाचा मालक रामदास घोलप यांना स्वत:च्या पाळीव श्वानाला आवरण्याची सूचना केली.
हेही वाचा – Badlapur School Case : पीडित बालिकेचा वैद्यकीय अहवाल शाळेने नाकारला
तुम्ही मला ही सूचना करणारे कोण, असा प्रश्न करून रामदास घोलप यांनी तक्रारदार मनोज सत्वे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली आणि असा प्रकार पुन्हा केला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. स्वत:च्या हातामधील काठी मनोज सत्वे यांच्या डोक्यात आणि हाताने जोराने मारून त्यांच्या हाताला इजा पोहोचेल अशा तऱ्हेने मारली. त्यानंतर रामदास घोलप यांनी सम्राट चौकातील भटक्या कुत्र्यांच्या मागे धाऊन त्यांना स्वत:च्या हातामधील काठीने निर्दयपणे मारहाण केली. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विष्ठेने नागरिक हैराण
डोंबिवली, कल्याण परिसरातील अनेक पाळीव श्वानांचे मालक आपली पाळीव कुत्री घेऊन मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर कुत्र्याला घेऊन भटकंती करतात. यावेळी पाळीव श्वान रस्त्याच्या कडेला मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर आपले विधी उरकतो. या विधीचा पादचाऱ्यांना येजा करताना त्रास होतो. पालिकेने अशाप्रकारे पाळीव कुत्री घेऊन सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या श्वानांसाठी स्वतंत्र विधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत.