प्राणिपालनाचा शौक सर्वसामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडचा आहे. ब्रिटिशांच्या राजवटीने प्राणिपालनाची शिस्तबद्ध रचना आपल्या देशात घालून दिली. जागतिकीकरणाच्या नजीकच्या काळात लोकांच्या आर्थिक स्तरातील बदल, राहणीमानात झालेली सुधारणा यांचे वातावरण इथल्या ‘पेट’ उद्योगाच्या भरभराटीसाठी पोषक ठरले. प्राणिपालनेतील साक्षरता अवगत केल्यानंतर गेल्या दोन-तीन दशकांपासून टेचात प्राणिपालन मिरविण्याची हौस नागरिकांमध्ये वाढत आहे. त्यातून मग परदेशी कुत्री, मांजरांची आयात, पक्ष्यांच्या दुर्मीळ जातींचे, कासव, रंगीबेरंगी माशांचे दिवाणखान्यातील आगमन हे काही घरांची ओळख ठरत आहे. परदेशी कुत्रे पाळण्याच्या भारतीय वेडाचे आता नावीन्य राहिलेले नाही. नव्या नव्या आणि अधिकाधिक दुर्मीळ श्वान प्रजाती भारतीय घरांमध्ये आज आहेत. पण गेल्या वर्षी आपल्याकडे एका परदेशी श्वानखरेदीच्या बातमीने अनेकांचे डोळे पांढरे केले होते. बंगळुरू येथील एस. सतीश या डॉग ब्रिडरने ‘कोरियन मॅस्टिफ’ जातीच्या कुत्र्याचे एक पिल्लू तब्बल एक कोटी रुपयांना विकत घेतले. भारतात आगमन झालेले या प्रजातीचे ते पहिलेच कुत्रे होते. एक कोटी रुपये कुत्र्यासाठी मोजण्याची घटना तशी दुर्मीळच असली तरी कुत्र्यांची खरेदी ऑनलाइन करता यायला लागल्यानंतर जगातील कोणत्याही कोपऱ्यातील आवडलेली प्रजाती आपल्या घरी आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करताना मागेपुढे पाहिले जात नव्हते. आता परदेशी प्रजाती आयात करण्यावर बंदी आली असली तरी आतापर्यंत, घर, जमीन, गाडी, गेलाबाजार सोने खरेदीसाठी चालणाऱ्या लाखांच्या गोष्टी आता कुत्रे, मांजर किंवा पक्ष्यांच्या खरेदीसाठी मध्यमवर्गीय घरातही होऊ लागल्या आहेत.
विमा कंपन्यांचाही विस्तार
लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी विमा कंपन्यांनीही आपले बस्तान बसवले आहे. अजूनही घोडे किंवा मोठय़ा प्राण्यांचा विमा उतरवण्याकडे अधिक कल असला. तरीही कुत्रे, मांजरी, पक्षी यांचा विमा उतरण्याची भारतीय मानसिकताही तयार होते आहे. मात्र त्यासाठी करावी लागणारी क्लिष्ट प्रक्रिया अजूनही या विमा कंपन्यांच्या विस्तारातील अडथळा ठरत आहे.
बंदीमुळे काळाबाजार
चीनमधून भारतात आयात झालेल्या कोरियन मॅस्टिफ जातीच्या पाहुण्यामुळे भारतीय पेट इंडस्ट्रीमध्ये येऊ घातलेल्या नव्या पर्वाला लगेचच ठेच बसली. विस्तारत जाणाऱ्या श्वान बाजारपेठेवर नियंत्रण आणण्यासाठी ‘पेट इण्डस्ट्री’वर बंधने आणण्याची शिफारस विधी आयोगाने केली. परदेशी प्राणी आयात करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली. प्राणी पाळल्याची कागदपत्रे मालकाकडे उपलब्ध असतील तरच त्या प्राण्यांना विमानप्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. वरवर पाहता या निर्णयाने सामान्यांवर थेट परिणाम होणारा नसला तरीही पेट इंडस्ट्रीमध्ये मात्र या निर्णयामुळे खळबळ झाली. या निर्णयानंतर भारतात ब्रीडिंग होणाऱ्या दुर्मीळ प्रजातींच्या कुत्र्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले. भारतात अनेक वर्षांपासून असलेल्या जर्मन शेफर्ड, सेंट बर्नार्ड, रॉटविलर या प्रजातींच्याही स्थानिक ब्रीडर्सकडील किमती वाढल्या, अशी माहिती पुणे केनल क्लबचे लक्ष्मण मद्देवार यांनी दिली. दुर्मीळ प्रजातींचे भाव वाढण्याबरोबरच गेल्या काही महिन्यात प्राण्यांच्या परदेशी प्रजातींचा काळाबाजारही वाढू लागला आहे. पक्षी, इग्वाना, सिंगापुरी पाणकासवे, स्टार बॅक कासवे यांची विक्री मागील दाराने सुरू झाली आहे.
श्वानमागणी अधिक
सध्या कुत्र्यांमध्ये तिबेटियन मॅस्टिफ, इंग्लिश मॅस्टिफ, अलास्कन मालमूट, केन कोर्सो, अकिता, इंग्लिश बुल डॉग, माल्टिस, अफगाण हाऊंड, माऊंटन शेफर्ड, न्यू फाऊंडलॅण्ड, रेड नोझ पिटबुल टेरिअर, चिवावा या प्रजातींच्या किमती लाखांच्या घरात आहेत. यातील बहुतेक प्रजाती या भारतीय ‘पेट इण्डस्ट्री’मध्ये आता स्थिरावल्या आहेत. त्याचे भारतातही अनेक ठिकाणी ब्रीडिंग सुरू झाले आहेत. याशिवाय परदेशी प्रजातींच्या पक्ष्यांच्या किमतीही लाखो रुपयांच्या घरात आहेत. महागडा प्राणी म्हणूनच ओळख असलेल्या परदेशी प्रजातीच्या घोडय़ांच्या किमती कोटी रुपयांच्या घरात आहेत.