अन्यत्र बदलीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा नियमानुसार कार्यकाळ जानेवारी महिन्यातच संपुष्टात आला असून त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली असून ३० ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

ठाणेस्थित सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी अ‍ॅड्. सागर जोशी यांच्यामार्फत जयस्वाल यांच्याविरोधात याचिका केली असून त्यांच्या कार्यकाळाबद्दल आक्षेप घेतला आहे.

कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ जयस्वाल हे पालिका आयुक्तपदी असल्याने त्यांचे ठाण्यातील राजकीय नेते, बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांशी लागेबांधे असल्याचा आरोप याचिकार्त्यांने केला आहे. शिवाय याचिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रतिवादी करण्यात आले असून जयस्वाल यांची त्वरित अन्यत्र बदली करण्याचे आदेश त्यांना द्यावेत. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत वा ती निकाली निघेपर्यंत त्यांना पालिका आयुक्त म्हणून कोणतेही निर्णय घेण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणीही याचिकाकर्त्यांने केली आहे.

जयस्वाल यांनी ३ जानेवारी २०१५ रोजी ठाण्याचे पालिका आयुक्त म्हणून पदभार सांभाळला होता. गेल्या ३ जानेवारी रोजी पालिका आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. असे असतानाही अद्यापही ते पालिका आयुक्तपदी कार्यरत आहेत. वास्तविक, महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यानुसार कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला ठोस कारणाशिवाय एका पदावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येत नाही.  तसे करणे नियमांचे उल्लंघन आहे. असे याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने त्यावरील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.