लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पश्चिम येथील बैलबाजार मधील हिंद पेट्रोलपंपावर शुक्रवारी दुपारी दोन तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. ते रांगेत न येता थेट पेट्रोल भरणा सयंत्राजवळ येऊन थांबले. पेट्रोल पंप कामगाराने त्यांना तुम्ही रांगेत या, इतर वाहन चालक रांगेत आहेत, असे बोलताच दोन्ही तरुणांनी कामगाराला मारहाण करुन पेट्रोल ओतणाऱ्या पाईपचा नोझल खेचला. यामुळे भीषण प्रकार घडला असता.
आणखी वाचा- डोंबिवलीजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया
इतर चालकांनी प्रसंगावधान राखून दोन्ही तरुणांना तेथून बाहेर काढले नसते तर पाईपचे नोझल तुटून पेट्रोल इतस्त पसरुन मोठी अनर्थकारी घटना घडली असती. मुकलीस मोहसीन फक्की, जावेद असमत डॉन अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. पेट्रोल पंपाचे मालक शैलेश काकराणी यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही तरुणांना अटक केली आहे.
शुक्रवारी दुपारी मुकलीस, जावेद दुचाकीवरुन हिंद पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पंपावर वाहनांची रांग होती. रांगेत न राहता दोघेही जण थेट पेट्रोल सयंत्राजवळ आले. त्यांनी तेथील कामगाराला आमच्या दुचाकीत पहिले पेट्रोल भर म्हणून दादागिरी सुरू केली. इतर वाहन चालक रांगेत आहेत. तुम्ही पण रांगेतून येऊन पेट्रोल भरा असे कामगार बोलताच, दोन्ही तरुणांनी कामगाराला मारहाण सुरू केली. रागाच्या भरात पेट्रोलचा पाईप ओढून तो स्वताहून पेट्रोल आपल्या दुचाकीत भरण्याचा प्रयत्न करू लागला. यामुळे मोठी अनर्थकारी घटना पेट्रोलपंपावर घडली असती. इतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांनी मुकलीस, जावेदला पेट्रोल पंपावरुन बाहेर काढले. तेथून ते आपल्या दुचाकीवर बसून निघून गेले.