डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी येत्या गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रोडवरील अप्पा दातार चौकमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळी सणाच्या काळात फडके रोडवर जमवून आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्याची डोंबिवलीतील नागरिकांची अनेक वर्षांची परंपरा आहे. जुन्या ज्येष्ठांनी सुरू केलेल्या या परंपरेला आता उत्सवी रूप आले आहे. दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत फडके रोड तरूणाईन गजबजून गेलेला असतो. या कालावधीत या रस्त्यावरून वाहन नाहीच, पण पादचाऱ्यांना चालण्यास जागा नसते.

सणाच्या कालावधीत फडके रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून डोंबिवली वाहतूक विभागाच्या प्रस्तावावरून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवार (ता.३१ ऑक्टोबर) ते शुक्रवार (ता. १ नोव्हेंबर) या कालावधीत रात्री १२ ते दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रोडवरील अप्पा दातार चौकमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना

ही वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेची रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने आणि इतर आपत्कालीन सेवेच्या वाहनांना हा आदेश लागू असणार नाही.

बाजीप्रभू चौकाकडून, चिमणी गल्ली भागातून फडके रोडवरील अप्पा दातार चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रोडवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फडके रोडकडे येणारी सर्व प्रकारची वाहने स. वा. जोशी शाळा, नेहरू रस्तामार्गे डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतील. फडके रोडकडे येणारी सर्व वाहने टिळक रस्ता, सावरकर रस्ता, इंदिरा चौकमार्गे डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतील.

Story img Loader