कल्याण- पावसाळ्यापूर्वीचे खड्डे मे, जून अखेर पर्यंत भरण्यात अपयशी ठरलेला शहर अभियंता विभाग आता मुसळधार पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने प्रवासी, वाहन चालकांच्या टिकेचा धनी झाला आहे. जुलै उजाडला तरी खड्ड्यांच्या निविदा प्रक्रियेत अडकलेल्या शहर अभियंता विभागाला टिकेच्या रोषा पासून वाचविण्यासाठी प्रशासनाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती, तक्रारी, निवेदने देण्यासाठी हेल्प लाइन क्रमांक जाहीर केला आहे.
(०२५१) २२०११६८ या हेल्प लाइन क्रमांकावर नागरिकांनी पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारी, निवेदने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले आहे. पालिका हद्दीत आतापर्यंत खड्ड्यात पडून दोन ज्येष्ठ नागरिकांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना रुग्णालयात दोन ते तीन लाख रुपये खर्च झाला आहे. इतर लहान मोठे अपघात विविध भागात सुरू आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कृतीने खड्डे बुजवून कार्यवाही करण्याऐवजी प्रशासनाने दूरध्वनी संपर्काचे तकलादू कारण पुढे केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पालिका मुख्यालयात, प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन खड्डे, नागरी विकास कामांच्या तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. हेल्प लाइनवरून केलेल्या तक्रारींची अधिकारी दखल घेतील का अशा शंका नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मोहने, टिटवाळा, डोंबिवली, कल्याण भागातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्डे मे, जून मध्येच का भरले नाहीत म्हणून शहर अभियंता विभागाला जाब विचारण्याऐवजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी नगररचना विभागातील वाद्ग्रस्त बदल्या, पदस्थापना, नगररचना विभागातील विकासकांच्या ४८ नस्ती मंजुरीत व्यस्त असल्याने आयुक्तांच्या कार्यपध्दती विषयी नागरिक रोष व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
यापूर्वी असा हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांवर आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई केली जात होती. गेल्या दोन वर्षात अभियंता, साहाय्यक आयुक्तांवर अशी कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासन ढेपाळले असून त्याचे चटके आता नागरिकांना खड्डे, बेकायदा बांधकामे अशा विविध माध्यमातून बसू लागले आहेत. दूरध्वनी तक्रारी केल्यानंतर खड्डे बुजविण्याची तत्परता प्रशासनाने दाखवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दहा प्रभागांच्या हद्दीत १० ठेकेदारांकडून खड्डे भरण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. पालिका हद्दीत ४२२ किमी लांबीचे रस्ते आहेत. ७५ टक्क्यांहून अधिक रस्ते डांबरीकरणाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकही नागरिकाला इजा होता कामा नये. असे काही घडले तर संबंधित अधिकाऱ्याला दोषी धरून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन हडबडून जागे झाले आहे. सिमेंटचा गिलावा, पेव्हर ब्लाॅक, खडीकरण, डीएलसी पध्दतीने खड्डे भरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
प्रभागातील अभियंते मात्र अद्याप ठेकेदारांना कामाचे लेखी आदेश नाहीत. त्यामुळे ते देयक निघेल का. अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार या भीतीने आदेशविना काम करण्यास तयार नाहीत असे अभियंते सांगतात. अभियंते आपल्या ओळखीच्या ठेकेदारांना हाताशी धरून प्रभागातील खड्डे भरण्याची कामे करून घेत आहेत. शहर अभियंता विभागाच्या निष्क्रियतेचा फटका शहराला बसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. खासगीत पालिका अभियंतेही शहर अभियंता विभागाच्या संथगती कामाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत.
दीड तासापासून फक्त रिंग वाजते
पालिकेने खड्ड्यांसाठी हेल्प लाइन जाहीर केल्यानंतर मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून अनेक रहिवाशांनी पालिकेच्या संबंधित क्रमांकावर संपर्क केला. त्या कक्षात कोणीही उपस्थित नव्हते. सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत आपण सतत या क्रमांकावर संपर्क करत होतो. कोणीही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती अनेक तक्रारदार नागरिकांनी दिली.