आपल्या जडणघडणीत, आपल्या विकासात आणि आयुष्यात प्राप्त केलेल्या यशामध्ये आपली शाळा, शिक्षक आणि शाळेने केलेले संस्कार आणि दिलेले शिक्षण या गोष्टींचे महत्त्वाचे योगदान असते. शाळेतले शिक्षण (आणि विशेषत: पूर्वप्राथमिक विभागातील शिक्षण) हे त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते, कारण तो पाया असतो. सर्वसाधारण मुलांप्रमाणे विशेष मुलांच्या विकासात विशेष शाळा आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले शिक्षक मोलाची भूमिका बजावतात. खरे तर या वर्गातील प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या समस्या/त्रुटी समजून घेऊन स्वावलंबी बनवण्याचे आव्हान हे विशेष शिक्षक स्वीकारतात आणि त्याला सामोरे जातात. हे खरोखरच फार मोठे आव्हान असते आणि इथे प्रत्येक शिक्षकाच्या सर्व क्षमतांची सतत कसोटी असते.
आपल्या आजुबाजूला दिसणाऱ्या सर्वसाधारण मुलांना दिले जाणारे शिक्षण आणि विशेष मुलांना दिले जाणारे शिक्षण या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आपण एखादी गोष्ट समजून घेतो, त्याचा आपल्याला अर्थ लागतो किंवा विषय शिकतो म्हणजे नक्की काय करतो? आपण श्रवण, स्पर्श, गंध, दृष्टी इ. आपल्या संवेदनांच्या मार्गाने मेंदूकडे संदेश पाठवतो. मेंदू मग त्या संदेशांचा अर्थ लावून आपल्याला योग्य कृती करण्याचा आदेश देतो. पण या विशेष मुलांच्या बाबतीत मात्र मेंदूच्या पेशींच्या रचनेपासून प्रतिसादापर्यंत कोणत्याही मार्गात अडथळे असू शकतात. प्रत्येक मुलाची समस्या समजून घेऊन त्यानुसार शिक्षणाची पद्धत अनुसरावी लागते. आणि म्हणूनच मतिमंदत्त्वाचे निदान झाल्यावर लवकरात लवकर विशेष शाळेत घालणे अत्यंत गरजेचे असते. कारण योग्य वयात विशेष शाळेतील शिक्षण या मुलांना प्राप्त झाले तर (प्रत्येकाच्या क्षमतेनुसार) मुलांमध्ये सुधारणा दिसून येते. विशेष शिक्षणाच्या माध्यमातून या मतिमंद मुलांमधील उपलब्ध क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे, वेगवेगळ्या पद्धती वापरून दैनंदिन जीवन कौशल्यांमध्ये स्वावलंबी बनवणे यावर पूर्णपणे भर दिला जातो. कारण अंतिम उद्दिष्ट असते ते त्यांना शक्य तितके स्वावलंबी आणि समाजोपयोगी बनवणे. जेणेकरून ते कोणालाही ओझे वाटणार नाहीत आणि त्यांना मुख्य समाजप्रवाहात आणणे शक्य होऊ शकेल.
समाजाची निकड लक्षात घेऊन विशेष शाळा स्थापन करणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. पी.डब्ल्यू.डी. अॅक्टच्या निकषानुसार स्वंतत्र वास्तूच्या बांधकामाची धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळा स्थापन करून विशेष मुलांना सेवा व सुविधा विनामूल्य पुरवणारी ठाणे महानगरपालिका ही भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आज ठाण्यातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असणारे अस्थिव्यंग, अपंग गटातील आणि मतिमंद विद्यार्थी (अतिचंचल, स्वमग्न, कमी बुद्धय़ांक असलेली मुले) यांच्यासाठी ही शाळा मोठे आशास्थान आहे.
जून महिना म्हणजे सर्व शाळांसाठी नवे शैक्षणिक वर्ष. ही शाळादेखील याला अपवाद नाही. ६ वर्षे पूर्ण झालेल्या विशेष मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी नवीन प्रवेशार्थीना तीन महिन्यांच्या काळात शाळेत रुळण्यासाठी अवधी दिला जातो. या काळात ती मुले शाळेतल्या वातावरणाशी जुळवून घेतात का नाही, त्यांच्या सवयी/लकबी, स्वत: कामे कितपत करू शकतात, वर्गातील मुलांबरोबर कसे जुळवून घेतात, त्यांना टॉयलेट ट्रेनिंग घरी दिले गेले आहे का? ती शांत/ अतिचंचल/ फीट येते का/ या दृष्टीनेही निरीक्षण केले जाते. कारण बऱ्याचदा पालक मुलाला शी-शू सांगता येत नाही किंवा फीट येते हे सांगायचे टाळतात किंवा विसरतात. या सगळ्या दृष्टीने निरीक्षण करून वर्गशिक्षिका त्या मुलाविषयीचे मत नोंदवतात आणि मग प्रवेशाविषयीचा अंतिम निर्णय घेतला जातो. साधारणपणे मुले (काही मुले) डॉक्टरांकडे किंवा उपचारपद्धतींसाठी तज्ज्ञांकडे गेलेली असतात, काही मुले सामान्य मुलांच्या शाळेत गेलेली असतात. मग अशी मुले तुलनेने शाळेशी लवकर जुळवून घेतात. सुरुवातीला अर्धा किंवा एक तास नवीन मुलांना शाळेत बोलावले जाते. जी मुले शाळेत हळूहळू रमू लागतात त्यांची वेळ टप्प्याटप्प्याने वाढवली जाते. पण काही मुले घरातच आणि विशेषत: आईबरोबरच जास्त वेळ असतात अशी मुले बाहेरच्यांबरोबर विशेष खेळलेली नसतात. त्यामुळे नवीन वातावरणात स्थिरावायला त्यांना जास्त वेळ लागतो. या निरीक्षण काळात पालकांना शाळेत थांबावे लागते आणि या सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असते. जी मुले छान स्थिरावतात, शाळेत रमतात आणि ती पुढे १० ते ४ अशी पूर्णवेळ शाळेत बसू शकतील अशी खात्री पटते त्यांचा प्रवेश नक्की होतो आणि त्यांना मग बससेवा आणि इतर सोयीसुविधाही प्राप्त होतात. या मुलांचा पूर्वप्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग आणि पूर्व व्यावसायिक विभाग असे विभाग या जिद्द विशेष शाळेत आहेत.
या विशेष मुलांपैकी बरीच मुले घरातल्या इतर सदस्यांकडून, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून उपेक्षित/दुर्लक्षित राहतात. ती सण समारंभात, कौटुंबिक कार्यात समवयस्क मुलांबरोबर खेळण्यापासूनही बऱ्याचदा वंचित राहतात. त्यामुळे त्यांना जिद्द शाळेतले प्रशस्त वर्ग, मोठी शाळा, शाळेतली बाग, बागेतली झाडे, घसरगुंडी/झोपाळा इ. खेळ, वर्गातली रंगीबेरंगी खेळणी याचे आकर्षण वाटू लागले आणि सर्वात मुख्य म्हणजे शाळा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विश्वास दिला जातो. वर्गशिक्षिका तर खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अपंग मूल आणि मतिमंद मूल यातील फरक लक्षात घेणे इथे खूप गरजेचे आहे. अपंग मुलात शारीरिक व्यंग असले तरी त्यांना बोलता येते वा स्वत:ला व्यक्त करता येते, भावना मांडता येतात. पण ही विशेष मुले अगदी मोजके शब्द जेमतेम बोलू शकतात, तेही स्पष्टपणे नव्हे. अशी मुलेही खूप कमी असतात. या मुलांना प्रेमाची, मायेची, आपुलकीची भाषा लवकर कळते, मायेचा स्पर्श खूप काही देऊन जातो. त्यामुळे ही प्रेमाची भाषा शिक्षिका आणि मूल यांच्यात बंध निर्माण करते, त्यांना जवळ आणते, विश्वास निर्माण करते. आईप्रमाणे ही बाई शाळेत आपली काळजी घेणार आहे ही सुरक्षितता निर्माण होते. त्याला सतत जवळ घेतल जातं, स्पर्श केला जातो आणि मग हळूहळू गाणी, बडबडगीत, रंगीबेरंगी खेळणी यांच्या माध्यमातून रमवण्यात यश प्राप्त केलं जातं. या काळात मुलांप्रमाणे पालकांचाही इतर समदु:खी पालकांबरोबर संवाद होतो, दु:ख काहीसे हलके होते, मनावरचा ताण कमी होतो. जिद्द विशेष शाळेच्या मुख्या अर्चना शेटे म्हणतात, ‘मुले केंद्रस्थानी असतात. त्यांच्या आवडीनिवडी, समस्या लक्षात घेऊन शिक्षक आणि कर्मचारी त्यांच्या विकासासाठी मनापासून प्रयत्न करतात. त्यांना इथे भरपूर प्रेम, माया मिळते, त्यांचे मनापासून कौतुक केले जाते. त्यांच्याकडे लक्ष पुरवलं जातं आणि या सगळ्या सकारात्मक गोष्टी त्यांना खूप काही देणाऱ्या असतात आणि त्यामुळे अल्पावधीतच ती शाळेत रुळतात आणि शिक्षक व कर्मचारी यांच्याशी त्यांचे खास नातेही जुळते. त्याचे कारण त्यांना मिळणारे निरपेक्षप्रेम आणि आपुलकी. याच काळात पालकही नव्या पालकांना भेटतात, अनुभवाची देवाणघेवाण होते, मनाची उद्विग्नता कमी होते. शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून मार्गदर्शन मिळते आणि मुलाला वाढवण्यासंदर्भात एक दिशा सापडते. त्यामुळे पालकांनाही विश्वास, आशा वाटते. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असते. मुलाच्या विकासाच्या दृष्टीने शाळा प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे पालकांचेही या प्रक्रियेत सातत्याने सहकार्य अपेक्षिक असते. कारण या मुलांचे स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होणे यात पालकांचे योगदान, त्यांचे परिश्रम हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जर या मुलांना आत्मनिर्भर करून मुख्यप्रवाहात आणायचे असेल तर शाळाचालक आणि समाज यांचे परस्पर सहकार्य, सामंजस्य यातूनच साध्य होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा