नाटय़ संमेलनावर कराव्या लगणाऱ्या जमा-खर्चाचे गणित बसविताना नाकीनऊ आलेल्या आयोजकांनी नाटय़ग्रंथ आणि साहित्य प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या भल्या मोठय़ा शामियानात चक्क लोणची, लाडू, चपला आणि साडय़ा विक्रेत्यांना भाडय़ाने जागा देण्यात आली आहे. संमेलनासाठी ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये मुख्य व्यासपीठ उभारण्यात आले असून याच ठिकाणी उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय संमेलनाच्या मुख्य सभागृहालगत नाटय़ साहित्य विक्रीसाठी सुमारे १४५ स्टॉल उभारले आहेत. मात्र त्यापैकी केवळ १८ ते २० स्टॉल्समध्ये प्रत्यक्ष साहित्याची विक्री होणार असून उर्वरित ठिकाणी लोणची, पापड यासारख्या साहित्याची विक्री होणार आहे. मोठा निधी जमविण्यासाठीच या स्टॉलचे विक्री व्यवस्थापन करण्यात आले आहे.
नाटय़ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्थानिक शिवसेना नेत्यांनी स्वीकारली असली, तरीही आयोजनाचा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात जात असल्याने हे गणित जमविताना आयोजकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. संमेलनाच्या निमित्ताने नाटकांसंबंधीचे साहित्य तसेच ग्रंथसंपदा उपस्थित रसिकांना उपलब्ध व्हावी यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये विक्री स्टॉल्ससाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. येथील प्रत्येक स्टॉलचे भाडे सुमारे पाच हजार रुपये इतके ठेवण्यात आले आहे. दीडशेच्या आसपास असलेल्या स्टॉलच्या भाडय़ामधून काही लाख रुपयांचे उत्पन्न जमा होणार असल्याने एकही स्टॉल रिकामा राहू नये असा आयोजकांचा प्रयत्न होता. त्यामुळे आयोजकांकडून राज्यभरातील प्रकाशक आणि नाटय़ साहित्यिकांशी संपर्क साधण्यात आला. संमेलन ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलमधून काही लाखाची रसद उभी राहणार असल्याने अधिकाधिक स्टॉल भाडय़ाने जावेत असा प्रयत्न होता. मात्र, राज्यभरातील प्रकाशकांकडून आयोजकांना पुरेसा प्रतिसाद मिळालाच नाही. त्यामुळे १४५ स्टॉलपैकी जेमतेम १८ ते २० स्टॉल्स हे ग्रंथसंपदेच्या विक्रीसाठी उपलब्ध झाले. प्रकाशकांचा प्रतिसाद नसल्यामुळे आयोजकांनी शक्कल लढवत उर्वरित स्टॉल्स चक्क लोणची, पापड आणि तत्सम वस्तूंच्या विक्रेत्यांना भाडय़ाने दिले आहेत.

नाटय़साहित्यिकांचा अल्प प्रतिसाद
नाटय़संमेलनाच्या ठिकाणी असलेल्या १४५ स्टॉलपैकी केवळ १८ ते २० नाटय़साहित्याचे स्टॉल असल्याची माहिती स्टॉल समितीच्या ऊर्मिला वारळकर यांनी दिली. राज्यातल्या जवळपास तीनशेहून अधिक प्रकाशकांना व नाटय़ साहित्यिकांना आमंत्रित केले होते. परंतु त्यापैकी केवळ १८ ते २० नाटय़साहित्यिकांनी व प्रकाशकांनी यामध्ये सहभाग नोंदविल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Story img Loader