डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात वाहतूक नियोजन करत असताना शनिवारी संध्याकाळी वाहतूक पोलिसांना एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. या इसमाने विष्णुनगर मासळी बाजार येथील स्कायवॉक वरुन जात असलेल्या एका नोकरदाराची पाठीमागील पिशवीची चेन हळूच उघडून त्यामधील तीन हजार रुपये चोरले. हा प्रकार निदर्शनास येताच वाहतूक पोलिसांनी त्या चोरावर झडप घातली. त्यांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न त्याने केला, तो निष्फळ ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली वाहतूक शाखेतील हवालदार बाळासाहेब होरे, वाहतूक सेवक दिनकर सोमासे यांनी पाकीटमाराला पकडण्याची कारवाई केली. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्तीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी वाहतूक विभागाचे हवालदार थोरे, सेवक सोमासे शनिवारी संध्याकाळी साडे सात वाजता विष्णुनगर मासळी बाजार भागात तैनात होते. यावेळी एक इसम बराच उशीर रेल्वे स्थानक भागात घुटमळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. विष्णुनगर मासळी बाजारा जवळील स्कायवॉकच्या जिन्यावरुन प्रवीण हांदे (३४, रा. अष्टविनायक चाळ, मोठागाव, वेताळनगर, डोंबिवली) हे पाठीमागे पिशवी लावून चालले होते. जिन्यावर गर्दी असल्याने रेल्वे स्थानक भागात घुटमळत असलेल्या इसमाने प्रवीण यांच्या पाठीमागील पिशवीची चेन खाली करुन त्या पिशवीच्या पाकिटातील तीन हजार रुपये गुपचूप काढून घेऊन गर्दीतून पळू लागला.

हवालदार होरे, सेवक सोमासे यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी आरोपी इसमाचा पाठलाग करुन त्याला चोरलेल्या पाकिटासह स्कायवॉकवर पकडले. हवालदार होरे यांनी दोंदे यांना तुमच्या पिशवीतील पैसे या इसमाने चोरले आहेत असे सांगताच पादचारी इसमा भोवती जमा झाले. तात्काळ विष्णुनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

पोलिसांनी चोरट्याला पोलीस ठाण्यातून नेले. त्याचे नाव चिन्हा भास्कर कुमार (२०) आहे असे त्याने सांगितले. तो कळवा येथे राहतो. पोलिसांनी प्रवीण हांदे यांच्या तक्रारीवरुन विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

चोरलेले पैसे परत

वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजन करताना चोराला पकडल्याने डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी हवालदार होरे, वाहतूक सेवक सोमासे यांचे पुष्प देऊन कौतुक केले. पादचाऱ्यांनीही वाहतूक पोलिसांच्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक केले. हवालदार थोरे यांनी पोलीस निरीक्षक गित्ते यांच्या उपस्थितीत प्रवीण हांदे यांचे चोरट्याने चोरलेले पैशाचे पाकीट दोंदे यांच्या स्वाधीन केले.

सकाळ, संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात अनेक भुरटे चोर फिरत असताना प्रवाशांनी आपला मोबाईल, पाकीट सांभाळून प्रवास करावा. कोणाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यास ती माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pickpocketer caught by traffic police at dombivli railway station zws