ठाणे : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा वापरण्यास ठाणे महापालिकेने प्रतिबंध केला असतानाच, अशाच एका मांज्यात अडकलेल्या कबुतरांचा प्राण कंठाशी आला होता. परंतु एका दक्ष नागरिकाची त्यावर नजर पडली आणि त्यानंतर अग्निशमन दल, पालिका विद्युत विभाग आणि आप्तत्कालीन व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी केलेल्या मदतकार्यामुळे कबुतरांची सुखरूप सुटका होऊन त्याचे प्राण वाचले.
पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नाही. पतंग उडवण्यासाठी केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे.
u
ठाणे महापालिकेच्या पथकाकडून दुकानांमध्ये तपासणी मोहिम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जात आहे. असे असतानाच, ठाण्यात अशाच एका मांज्यात अडकलेल्या कबुतरांचा प्राण कंठाशी आला होता. पोखरण रस्ता क्रमांक २ वरील गांधीनगर भागातील पाण्याच्या टाकी जवळील विद्युत खांबावर मांज्यामध्ये एक कबुतर अडकले होते. बराच वेळ त्याची सुटकेसाठी धडपड सुरू होती. पण, सुटकेऐवजी मांज्या गुंत्यात तो आणखी अडकला होता. दरम्यान, सुटकेसाठी धडपड सुरू असलेल्या या कबुतराकडे परिसरातील एका नागरिकांची नजर गेली आणि त्यांनी माहिती देताच अग्निशमन दल, पालिका विद्युत विभाग आणि आप्तत्कालीन व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन वाहनांच्या शिडीद्वारे जवानांनी कबुतरांपर्यंत पोहचून त्याची मांज्यातुन सुखरूप सुटका केली.